कास्टिंग काऊचविरोधात श्री रेड्डी या अभिनेत्रीने टॉपलेस आंदोलन केल्यानंतर या प्रकरणाला पुन्हा वाचा फुटली. राधिका आपटे, करीना कपूर, सोनम कपूर, उषा जाधव यांसारख्या अभिनेत्रींनी यावर भाष्य केल्यानंतर आता अभिनेत्री माही गिलने आपले मौन सोडले आहे.

माही सांगते, कास्टिंग काऊचचे काही अनुभव मला सिनेसृष्टीत आले आहेत. मी एका दिग्दर्शकाला भेटायला गेले तेव्हा मी सलवार सूट घातला होता. मी त्याला भेटल्यावर त्याने पहिली प्रतिक्रिया माझ्या ड्रेसवरच दिली. तू सलवार सूट घालून दिग्दर्शकाला भेटायला आलीस तर तुला सिनेमा कोण देणार? असा त्याचा प्रश्न होता. त्यानंतर मी आणखी एका दिग्दर्शकाला भेटले त्याने तर थेट तू नाईटीमध्ये कशी दिसतेस ते बघायचे आहे असेच सांगितले. या अनुभवांमधून मी गेले मला काहीसा धक्का बसला पण समाजात अशा प्रवृत्तीचे लोक असतात असे माही गिलने म्हटले आहे.

मी सुरुवातीला मुंबईत आले आणि हिंदी सिनेसृष्टीत काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते तेव्हा आलेले हे अनुभव आहेत. त्यानंतर मला सल्ला देणारे अनेक लोक होते. एक्स्पोज केल्याशिवाय काम मिळणार नाही, सलवार सूट घालून काम मिळत नसते असे सल्ले मला देण्यात आले. मात्र मी माझ्या मतांवर ठाम राहिले.

माही गिल ही अभिनेत्री खरेतर तिच्या बोल्ड अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. साहेब बीबी और गँगस्टर असेल किंवा देव डी मधील तिच्या भूमिका बोल्ड होत्या. मात्र ऑफ स्क्रीन ती पूर्णपणे वेगळी आहे. हिंदी सिनेसृष्टीत तुमचा फायदा घेणारे लोक टपलेलेच असतात मात्र सगळेच लोक वाईट नाहीत असेही माहीने स्पष्ट केले. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

ज्येष्ठ नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांनी काही दिवसांपूर्वी कास्टिंग काऊचच्या मुद्द्यावरुन एक वक्तव्य करत पुन्हा एकदा या विषयाला नवी वाचा फोडली. खान यांनी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल निर्माण झालेलं संतापाचं वातावरण पाहून त्यानंतर माफीही मागितली. पण, तोवर फारच उशिर झाला होता. कारण, आता संपूर्ण कलाविश्वात या एकाच विषयाच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता अनेक अभिनेत्रींनी घेतलेल्या भूमिकानंतर अभिनेत्री माही गिलनेही तिचा अनुभव कथन केला आहे.