ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाऊसफुलचे बोर्ड लागत होते, ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते, ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येणार आहेत. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीला त्यांनी वैभवाचे दिवस आणले. अनेक तरुण अभिनेत्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले. प्रभावशाली संवादफेक, जरब बसणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती. रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, शितू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, मधुमंजिरी या आणि अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या. या महान अभिनेत्याला वायकॉम १८ मोशन पिक्चर्स दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ‘आणि.. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे.

अभिनेता सुबोध भावे हे जबरदस्त व्यक्तिमत्व पडद्यावर साकारत आहे. त्याचसोबत सोनाली कुलकर्णी आणि सुमित राघवन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ७ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सुबोध भावे एका अनोख्या भूमिकेत आणि वेगळ्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

१९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या ‘आणि काशिनाथ घाणेकर’मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे. त्यांनी मराठी रंगभूमीचा चेहेरामोहरा नाट्यमयरित्या बदलून टाकला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.