अभिजीत बिचुकले हे नाव गेल्या काही दिवसांपासून चांगलंच चर्चेत आहे. बिग बॉस मराठी या वादग्रस्त रिअॅलिटी शोमधील त्यांचा वावर आणि त्यानंतर गेल्या शुक्रवारी म्हणजेच २१ जून रोजी बिग बॉसच्या घरातूनच त्यांना झालेली अटक या घटना त्याला कारणीभूत ठरल्या. साताऱ्यातील एका जुन्या चेक बाऊन्सप्रकरणी त्यांना अटक झाली. त्यानंतर एक खंडणी प्रकरणसुद्धा समोर आलं. गेल्या आठवड्याभरातील या घडामोडींमुळे गुगलवर अभिजीत बिचुकलेंचा सर्च वाढला आहे. इतकंच नव्हे तर सर्चच्या बाबतीत बिचुकलेंनी ‘बिग बॉस मराठी’चे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनाही मागे टाकलं आहे.

‘गुगल ट्रेण्ड्स’चा आढावा घेतला तर गेल्या सात दिवसांत म्हणजेच जेव्हापासून बिचुकलेंना अटक झाली तेव्हापासून गुगलवर त्यांचा सर्च वाढल्याचं दिसत आहे. २१ जून रोजी म्हणजेच त्यांच्या अटकेच्या दिवशी हा सर्च सर्वाधिक होता. महेश मांजरेकरांसोबत बिचुकलेंनी अभिनेते व खासदार अमोल कोल्हेंनाही मागे टाकलं आहे.

‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात अभिजीत बिचुकलेंची सर्वाधिक चर्चा झाली. घरातील वावर, शिवीगाळ यांमुळे ते चर्चेत आले. दरम्यान चेक बाऊन्स प्रकरणात बिचुकलेंना जामीन मिळाला होता. मात्र खंडणीच्या प्रकरणी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आता खंडणी प्रकरणातील तक्रारदाराने त्यांची तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या पुढील निर्णयानंतर बिचुकले पुन्हा बिग बॉसच्या घरात जाऊ शकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.