महानायक अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार हा सिनेसृष्टीतील सर्वात मोठा बहुमान समजला जातो. हाच पुरस्कार अमिताभ बच्चन यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतील योगदानाबाबत हा पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रत्येक भारतीयाला आणि सिनेरसिकाला अभिमान वाटावा अशीच ही बातमी आहे.

अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार जाहीर होताच विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करणारे ट्विटही करण्यास सुरुवात केली आहे. केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही अमिताभ बच्चन यांचे अभिनंदन केले आहे. अमिताभ बच्चन यांनी सात हिंदुस्थानी या सिनेमापासून आपली कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर त्यांच्या रुपाने भारतीय सिनेसृष्टीला एक महानायक मिळाला. आता त्यांचा सन्मान सिनेक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने केला जाणार आहे. केंद्र सरकारने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.

 

सात हिंदुस्थानी, आनंद, रेश्मा और शेरा, गुड्डी हे अमिताभ बच्चन यांचे सुरुवातीच्या काळातले सिनेमा होते. 1973 मध्ये आलेल्या जंजीर या सिनेमामुळे त्यांची इमेजच बदलून गेली. हिंदी सिनेसृष्टीला अँग्री यंग मॅन मिळाला. हा अँग्री यंग मॅन म्हणून जवळपास दोन दशकांहून अधिक काळ अमिताभ बच्चन वावरले. विजय खन्ना हे त्यांनी साकारलेलं पात्र हिंदी सिनेसृष्टीतला माईलस्टोनच म्हणता येईल. त्यानंतर मग दीवार, शोले, जमीर, कभी कभी, हेरा-फेरी, रोटी कपडा और मकान, अग्नीपथ, डॉन, शक्ती, शहनशाह या आणि अशा अनेक चित्रपटांमधून त्यांनी मनोरंजन केलं.

इन्सानियत सिनेमानंतर त्यांनी ब्रेक घेतला होता. त्यानंतर मृत्यूदाता या सिनेमाद्वारे कमबॅकही केलं. पण तो सिनेमा फ्लॉप झाला. मात्र 2000 पासून त्यांची चरित्र भूमिका करण्यास सुरुवात केली. विविधांगी भूमिका अमिताभ बच्चन यांनी केल्या. ज्याला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. बागबान, कभी खुशी कभी गम, खाकी, लक्ष्य, बंटी और बबली, पा, विरुद्ध, फॅमिली, सरकार राज, बुढ्ढा होगा तेरा बाप, 102 नॉट आऊट हे आणि असे सिनेमा केले. गेल्या चार दशकांहून अधिक काळ ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती या शोला ही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोचेही सगळे सिझन गाजले. चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अमिताभ बच्चन यांना आता दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.