‘पद्मवती’ सिनेमावरून वाद सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमिताभ बच्चन यांनी एक शब्दही न बोलल्याबद्दल अभिनेते आणि भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी टिका केली आहे. ट्विटवरून सिन्हा यांनी राजकारण आणि चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांच्या गप्प बसण्याच्या भूमिकेवर टिका केली.

‘पद्मावती’ एक मोठा विषय झाला आहे. सर्वोत्तम अभिनेते असणारे अमिताभ बच्चन, परिपूर्ण अभिनेता आमिर खान आणि सर्वात लोकप्रिय अभिनेता शाहरुख खान यांनी याबद्दल आपले मत कसे व्यक्त केले नाही असा प्रश्न आता लोक विचारु लागले आहेत. तसेच आपले सूचना प्रसारण मंत्री आणि सर्वाधिक लोकप्रिय माननीय पंतप्रधान याप्रकरणाबद्दल गप्प का आहेत असे खोचक प्रश्न सिन्हांनी ट्विटवरून विचारले आहेत.

इतरांवर टिका करतानाच या वादावरील आपली बाजू सिन्हा यांनी स्पष्ट केली आहे. ‘पद्मावती’चे निर्मात संजय लीला भन्साली आणि राजपूत समाजाची संवेदनशीलता लक्षात घेता मी याबद्दल माझे मत मांडत असल्याचे सांगितले. यासंदर्भात भन्साली काही बोलल्यानंतरच मी मत व्यक्त करणे योग्य ठरेल. मी सिनेनिर्मात्यांचे हित आणि महान राजपूतांची संवेदनशीलता, विरता आणि तत्वनिष्ठता असं सर्व काही लक्षात घेऊनच या संदर्भात सविस्तपणे मत व्यक्त करु शकेन असे सिन्हा म्हणाले.

‘पद्मावती’ वादाबद्दल बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी मौन बाळगले आहे. सामान्यपणे अनेक सामाजिक आणि सिनेमासंदर्भातील विषयांमध्ये मनमोकळेपणे बोलणाऱ्या अभिनेत्यांनी मौन बाळगल्याबद्दल सर्वच स्तरातून आश्चर्य व्यक्त होत आहे.

हा सिनेमा म्हणजे राजपूतांची राणी पद्मावतीच्या शौर्याला वाहिलेली श्रद्धांजली असल्याचे भन्साळींनी म्हटले आहे. मागील काही दिवसांपासून या वादाने राजकिय वळण घेतले असून भाजपच्या एका नेत्याने पद्मावतीची भूमिका करणाऱ्या दिपिका पादुकोण आणि दिग्दर्शक संजय भन्साळींचा शिरच्छेद करणाऱ्याला १० कोटींचे बक्षीस जाहीर केले. ऐतिहासिक तथ्ये निर्मात्यांनी कशाही प्रकारे हाताळल्याची टिका राजपूत समाजाने केली आहे. देशभरात सध्या ‘पद्मावती’वरून रोज एखादे वक्तव्य समोर येत आहे. हा सिनेमा १ डिेसेंबरला प्रदर्शित होणार होता मात्र वादाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.