अभिनेत्री तनुश्री दत्ताच्या आरोपांवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे असत्य आहे ते असत्यच आहे, असं म्हणत त्यांनी तनुश्रीचे आरोप फेटाळले. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नानांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्रीनं केला. अमेरिकेहून परतलेल्या तनुश्रीने एका मुलाखतीदरम्यान ‘मी टू’ #MeToo मोहिमेबद्दल बोलताना हे आरोप केले.

‘मी याआधीही उत्तर दिलं आहे. जे खोटं आहे ते खोटंच आहे,’ असं नाना म्हणाले. गाण्याच्या शूटिंगदरम्यान नानांनी माझ्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असभ्य वर्तन केले, असा आरोप तिने केला. यानंतर तनुश्रीने सातत्याने नाना पाटेकर, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, कोरिओग्राफर गणेश आचार्य यांच्यावर आरोप केले. या पार्श्वभूमीवर नाना पाटेकर आणि विवेक अग्निहोत्री यांनी तनुश्रीला नोटीस बजावली होती. तनुश्रीने माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे या नोटीशीत म्हटले होते.

तनुश्रीने नानांवर केलेल्या आरोपाने अख्खे बॉलिवूड ढवळून निघाले आहे. तनुश्री विरुद्ध नाना हा वाद रंगला असतानाच बॉलिवूडमध्ये दोन गट तयार झाले आहेत. एक गट तनुश्रीच्या तर एक नानांच्या पाठीशी आहे. तनुश्रीने फक्त आरोप करण्याऐवजी पुरावे सादर करावे असं काहींचं म्हणणं आहे. तर तनुश्रीने न घाबरता याविरोधात लढा दिला पाहिजे असं काहींचं मत आहे.