प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्र मंडळातर्फे चित्रपट कारकिर्दीची पन्नास वर्ष पूर्ण करणारे अभिनेते सचिन पिळगावकर यांना यंदाचा यशवंतराव चव्हाण कलागौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार १ रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. वेंगुर्ले येथील वीरधवल परब यांच्या ‘फक्त मम म्हण’, वाशी येथील साहेबराव ठाणगे यांच्या ‘पाऊस पाणी’ आणि उस्मानाबाद येथील डी. के. शेख यांच्या ‘दंगल आणि इतर कविता’ या तीन कवींना यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. ५ हजार १ रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रविवारी (१२ मार्च) टिळक स्मारक मंदिर येथे रात्री आठ वाजता होणाऱ्या कार्यक्रमात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती वात्रटिकाकार रामदास फुटाणे आणि ट्रस्टचे संजय ढेरे यांनी मंगळवारी माहिती दिली. उत्तरार्धात होणाऱ्या कविसंमेलनात पुरस्कारविजेत्या कवींसह नितीन देशमुख, आबेद शेख, प्रदीप निफाडकर, संदीप खरे, प्रकाश घोडके, अशोक थोरात, प्रशांत मोरे आणि संदीप जगताप यांचा सहभाग आहे.