नाटक सुरु असताना प्रेक्षकांचे मोबाईल वाजणं ही बाब नवी राहिलेली नाही. अभिनेते विक्रम गोखले, अभिनेता सुमित राघवन यांच्यासह अनेक कलाकरांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. आता अभिनेता सुबोध भावेनेही नाटकाच्या प्रयोगादरम्यान वाजणाऱ्या मोबाईलबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर मोबाईल प्रयोगादरम्यान असेच वाजणार असतील तर आपण नाटकात काम करणं बंद करु असंही सुबोध भावेने म्हटलं आहे. फेसबुक पोस्ट लिहून सुबोध भावेने त्याचा संताप व्यक्त केला आहे. तसंच ट्विटरवर त्याने नाराजी व्यक्त केली आहे.

 

नेमकं काय म्हटलं आहे सुबोध भावेने?

अनेक वेळा सांगून,विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नाही. यावर उपाय एकच या पुढे नाटकात काम न करणं. म्हणजे त्यांच्या फोनच्या मध्ये आमची लुडबुड नको. कारण फोन जास्त महत्त्वाचा.नाटक काय टीव्ही वर पण बघता येईल.

सुबोध भावे सध्या अश्रूंची झाली फुले या नाटकात काम करतो आहे.  नाटक सुरु असताना जर मोबाईल वाजला तर सुजाण प्रेक्षक आणि रंगमंचावर काम करणारे कलाकार या दोघांनाही त्याचा त्रास होतो. याबाबत नाट्यगृहात प्रयोग सुरु होण्याआधी विनंतीही केली जाते. तरीही अनेकदा प्रयोगादरम्यान मोबाईल वाजण्याच्या घटना घडतातच. आता याबाबत अभिनेता सुबोध भावेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.