करोना महामारी आणि त्यामूळे देशभरात सुरू केलेल्या लॉकडाउनमुळे लोकांची आर्थिक गणितं विस्कळीत झालीयेत. फिल्म इंडस्ट्रीला सुद्धा याचा मोठा फटका बसलाय. लॉकडाउनमुळे कित्येकांचे जीव गेले तर कित्येक जणांचे दोन वेळच्या जेवणाचे हाल झाले. ‘निशांत’, ‘नजराना’, ‘बेटा हो तो ऐसा’ सारख्या चित्रपटातून झळकलेल्या अभिनेत्री सविता बजाज या सुद्धा याच परिस्थितीतून जात आहेत. नुकतंच त्यांनी आपण आर्थिक अडचणीत सापडल्याबाबत खुलासा केलाय. केवळ इतकंच नव्हे तर त्यांच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. त्यांनी जपून ठेवलेल्या पैशांवर आतापर्यंत त्यांनी कसेबसे दिवस काढले. परंतु आता त्यांच्या वाढत्या वयाबरोबरच वाढत्या आजारपणाचा उपचार करण्यासाठी पैसेच उरले नाहीत. तीन महिन्यांपूर्वीच त्यांना करोनाने घेरलं असल्यानं २२ दिवसांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

अभिनेत्री सविता बजाज यांनी नुकतंच एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुसाला केलाय. एकीकडे वाढत्या वयाबरोबर त्यांचं आजारपण ही वाढत चाललंय. तर दुसरीकडे औषधांसाठी त्यांच्याकडे पैसेच शिल्लक राहिले नाहीत. “मला श्वसनाचा आजार सुरू झालाय, या परिस्थितीत मी कसं जगेल मलाच माहित नाही”, असं अभिनेत्री सविता बजाजनं म्हटलंय. अभिनेत्री सविजा बजाज यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या घरी देखील कुणी नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा स्विकार केला नाही. २५ वर्षापूर्वी दिल्लीमध्ये असलेल्या घरी राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पण त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना घरी राहण्यास नकार दिला होता. “मी आतापर्यंत खूप कमवलं… अनेकांची देखील मदत केली…पण आता माझी मदत करण्यासाठी कुणी नाही”, असं बोलताना अभिनेत्री सविता बजाज यांच्या डोळ्यात निराशा दिसून आली.

तीन महिन्यांपूर्वी त्यांना करोना झाल्यामुळे २२ दिवस त्या रूग्णालयात उपचार घेत होत्या. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. करोनाला तर त्यांनी हरवलं पण आता श्वसनाचा आजार सुरू झालाय. CINTAA आणि रायटर्स एसोसिएशनने २०१६ साली त्यांना एक लाख रुपयांची मदत केली होती. त्यावेळी त्यांचा एक अपघात झाल्याने रूग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांनी केलेली ही मदत अभिनेत्री सविता बजाज यांना परत करायची आहे, पण वाढतं वय आणि आजारपण पाहून त्या काम करू शकत नाहीत. त्या आजारी असल्या तरी काम करण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. पण काम कसं करू? असा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिलाय.

अभिनेत्री सविता बजाज यांनी त्यांच्या सारख्या कलाकारांसाठी एक वृद्धाश्रम निर्माण करण्याची मागणी केलीय. जे कलाकार वयोवृद्ध आहेत, मुंबईत राहतात पण स्वतःचं घर घेऊ शकत नाही अशा कलाकारांसाठी हे वृद्धाश्रम असावं, असं देखील त्यांनी म्हटलंय.

अभिनेत्री सविता बजाज सध्या मुंबईतल्या मालाड इथल्या एका वन रूम किचनच्या घरात राहतात. या घरासाठी त्यांना महिन्याला ७००० रूपये घरभाडं द्यावं लागतं.

अभिनेत्री सविता बजाज यांनी केवळ चित्रपटातच नव्हे तर ‘नुक्कड’, ‘मायका’ आणि ‘कवच’ सारख्या टीव्ही मालिकांमध्ये सुद्धा काम केलंय.