गेल्या काही दिवसांपासून अभिनेते मुकेश खन्ना हे चर्चेत आहेत. या चर्चा त्यांनी कपिल शर्मा शोमध्ये जाण्यास नकार दिल्यामुळे सुरु झाल्या होत्या. आता मुकेश खन्ना यांनी अक्षय कुमारचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’वर निशाणा साधला आहे.
नुकताच मुकेश खन्ना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ‘लक्ष्मी बॉम्ब या नावाने एखादा चित्रपट प्रदर्शित व्हायला हवा का? यावरुन संपूर्ण देशात वाद सुरु आहे. काही लोक चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी करत आहेत. मला विचारलत तर चित्रपटावर बहिष्कार टाकणे चुकीचे ठरेल. कारण चित्रपट अद्याप कोणी पाहिलेला नाही. चित्रपट प्रदर्शित झालेला नाही’ असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे त्यांनी, ‘या चित्रपटाचे शिर्षक लक्ष्मी बॉम्ब ठेवण्याची परवानगी देण्यात यायला हवी होती का? माझ्या मते अजीबात नाही. तुम्ही अल्लाह बॉम्ब असे चित्रपटाचे नाव ठेवू शकता का? नाही ना. मग लक्ष्मी बॉम्ब कसे ठेवले?’ असे म्हटले आहे. त्यांनी पोस्टमध्ये लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे पोस्टर देखील शेअर केले आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे.
यापूर्वी मुकेश यांनी कपिल शर्मा शोवर टीका केली होती. महाभारत या मालिकेची टीम ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली होती. पण मुकेश खन्ना यांनी शोवर टीका करत तेथे जाण्यास नकार दिला. ‘द कपिल शर्मा शो हा जरी संपूर्ण देशात लोकप्रिय असला तरी मला यापेक्षा वाईट कोणताही शो वाटत नाही. या शोमध्ये दुहेरी अर्थांचे विनोद असतात, पुरुषांना महिलांचे कपडे परिधान करायला देतात आणि लोकं पोट धरुन हसतात’ अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी टीका केली होती.