‘मेकअप करणाऱ्या महिला या बुद्धिवान नसतात, त्या संवेदनशील नसतात असं मानणं पूर्णपणे चुकीचं आहे, असं मत बॉलिवूड अभिनेत्री, सौंदर्यवती ऐश्वर्या राय बच्चन हिनं व्यक्त केलं आहे. जगात सुंदर या शब्दाची संकल्पनाच वेगळी आहे. त्यातून महिलांचं सौंदर्य हे उजळ वर्ण, झिरो फिगर या मानसिकतेची फुटपट्टी लावूनच मोजलं जातं. मेकअप करणाऱ्या महिला या फक्त सुंदर असतात, मात्र त्या बुद्धीवान नसतात असा पूर्वग्रह असणारे लोक अजूनही आहेत अशा लोकांना ऐश्वर्यानं सडेतोड उत्तर दिलं आहे.

‘आपण महिलांनी एकमेकींना चुकीच्या पद्धतीनं पारखणं किंवा एकमेकींविषयी चुकीचे अंदाज बांधणं वेळीच थांबवलं पाहिजे. मेकअप करणाऱ्या महिलांना अक्कल नसते, त्या संवेदनशील, दयाळू नसतात असा पूर्वग्रह आहे तो वेळीच बदलला पाहिजे असं ऐश्वर्या म्हणाली. ऐश्वर्या ही लोरिअल पॅरिस या जगप्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनीची सदिच्छादूत आहे. नुकतीच तिनं कानला उपस्थिती लावली यावेळी दिलेल्या मुलाखतीत तिनं आपलं मत मांडलं आहे. कानला उपस्थित राहण्याचं हे तिचं १५ वं वर्ष आहे.

ज्या महिला मेकअप करत नाही त्या खूप बुद्धीवान असतात असाही समज आहे तोदेखील चुकीचा आहे असं मतही तिनं मांडलं आहे. मेकअप न करणारी महिला बुद्धीवान आहे किंवा त्यांना कोणत्याही गोष्टीत फारसं स्वारस्य नसतं. त्या खूपच गंभीर आणि थट्टा मस्करी न करणाऱ्या असतात असंही मानणं पूर्णपणे चुकीचं आहे हेही तिनं ठासून सांगितलं. मेकअप हा पूर्णपणे वेगळा विषय त्याचा बुद्धीशी काहीऐक संबध नाही त्यामुळे या कारणावरून एखाद्या महिलेची पारख करणं चुकीचं असल्याचं स्पष्ट मत तिनं व्यक्त केलं आहे.