आठ वर्षाचा अक्षत सिंग त्याच्या सलमान खानसारख्या डान्सिंग स्टाईलने जगभरात प्रसिद्धा झाला आहे. ‘दी एलेन शो’ या जगप्रसिद्ध शोमध्ये त्याला परफॉर्म करण्याची संधी मिळाली. गुटगुटीत अक्षतने ‘दी एलेन शो’च्या स्टेजवर छोट्याशा मोटरसायकलवर एन्ट्री घेऊन हेडस्टॅण्ड, कार्टव्हिल आणि बॉलिवूड-स्टाईल या डान्सिंग मुव्हजद्वारे उपस्थितांची मने जिंकली. अचंबित करणारा त्याचा परफॉर्मन्स संपताच, उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे अभिनंदन केले आणि सर्वांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. कोलकाता येथे राहणारा अक्षत ‘इंडिया गॉट टॅलेन्ट’ शोचा उप-विजेता आहे. एलेन डेगेंरेसने स्वत: अक्षतला आपल्या शोमध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर मागील आठवड्यात अक्षत अमेरिकेला रवाना झाला होता. अक्षतची शरीरयष्टी जरी जाड असली, तरी स्टेजवरची त्याची एनर्जी आणि त्याच्या डान्सिंग मुव्हज् अचंबित करणाऱ्या आहेत. सलमानचा चाहता असलेल्या अक्षतला सलमानच्याच गाण्यावर या शो मध्ये डान्स करायचा होता, परंतु सदर गाणे वाजविण्यास परवानगी मिळू शकली नाही. असे असले तरी, अक्षतने आपल्या पॉवरपॅक परफॉर्मन्सने उपस्थितांना अचंबित करून सोडले आणि त्यांची वाह… वाह… मिळवली. स्वत: एलेनने अक्षतचे नाव असलेली मोटरसायकल त्याला भेट म्हणून दिली. जेव्हा एलेनने अक्षतला त्याच्या नृत्य सरावाबाबत विचारले, तेव्हा तो म्हणाला, दर दिवशी मी तीन तास नृत्याचा सराव करतो आणि इतर वेळी खातो. तो पुढे म्हणाला, जर गाडीत तुम्ही पेट्रोल भरले नाहीत तर ती चालणार नाही. यावर उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाटात एकच हशा उसळला.
‘दी एलेन शो’मध्ये अक्षतला डान्स करताना पाहा :