अभिनेता अक्षय कुमारने काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीची बरीच चर्चाही रंगली. या मुलाखतीनंतर अक्षयने एका वृत्तपत्राशी बोलताना पंतप्रधान मोदी यांच्यासोबत केलेल्या चर्चेचा अनुभव सांगितला. विशेष म्हणजे मोदींची मुलाखत घेण्यापूर्वी अक्षयच्या मनावर प्रचंड दडपण आलं होतं.मात्र मोदींसोबत चर्चा केल्यानंतर ते दूर झालं असं अक्षयने यावेळी सांगितलं. ही मुलाखत पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांची मत, प्रतिक्रिया देत अक्षयचं कौतुक केलं. मात्र अक्षय एका खास व्यक्तीच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे.

“ही मुलाखत पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर काही जणांना त्यांचं मतही व्यक्त करायचं आहे. अनेक जण सतत फोन, मेसेज करुन मला शुभेच्छा देत आहे,तर काही जण चांगला सल्लाही देत आहेत. मात्र मी फार कमी जणांच्या प्रतिक्रियांना उत्तर देऊ शकलो आहे. काही प्रतिक्रिया तर मला पाहतादेखील आल्या नाहीयेत. परंतु या साऱ्यामध्ये मी माझ्या आईच्या प्रतिक्रियेची वाट पाहत आहे”, असं अक्षय म्हणाला.

पुढे तो म्हणाला, “ज्यावेळी मी माझ्या आईची संवाद साधेन तेव्हा मला खरी प्रतिक्रिया मिळेल. मी केलेल्या प्रत्येक कामानंतर ती तिचा फिडबॅक देत असते. त्यामुळे मला तिच्या प्रतिक्रियेची सर्वात जास्त उत्सुकता आहे”.

दरम्यान, अभिनेता अक्षय कुमारने पंतप्रधान मोदी यांची मुलाखत घेत त्यांच्या राजकीय, सामाजिक प्रवास जाणून घेतला. या मुलाखतीनंतर अक्षयने पंतप्रधान मोदी यांच्या स्वभावातील अनेक गुणवैशिष्ट्ये चाहत्यांसोबत शेअर केले.