अभिनेता अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत ‘लक्ष्मी’ हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा भावला नसल्याचं दिसून येत आहे. सध्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून वेळ वाया घालवण्यासारखं असल्याचं म्हटलं आहे. त्यातच आयएमडीबी (IMDb) रेटिंगवरदेखील ‘लक्ष्मी’ अपयशी ठरल्याचं दिसून येत आहे. या चित्रपटाला १० पैकी २.६ रेटिंग मिळालं आहे.

आयएमडीबीवर कमी रेटिंग मिळाल्या पहिल्या १० चित्रपटांमध्ये ‘लक्ष्मी’ या चित्रपटाचा समावेश झाल्याचं सांगण्यात येत आहे. लक्ष्मीला आतापर्यंत ६ हजार रेटिंग्स मिळाले आहेत. सध्या अनेक चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होत असल्यामुळे लक्ष्मीदेखील डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत कियारा आडवाणीने स्क्रीन शेअर केली आहे. यापूर्वी ‘सडक 2’, ‘रेस 3’, ‘गुंडे’, ‘हिम्मतवाला’, ‘रामगोपाल वर्मा की आग’, ‘कर्ज’, ‘जोकर’ या चित्रपटांना कमी रेटिंग मिळालं आहे.

आणखी वाचा- अक्षय-कियाराच्या ‘लक्ष्मी’ला झटका, चित्रपट झाला लीक?

आयएमडीबी म्हणजे काय?

आयएमडीबीचा फुलफॉर्म आहे इंटरनेट मुव्ही डेटाबेस. जसं नावावरुनच स्पष्ट होतं आहे, त्याप्रमाणे आयएमडीबी हा एक ऑनलाइन डेटाबेस प्लॅटफॉर्म असून यावर चित्रपट पाहणारे चाहते एखाद्या कलाकृतीचा दर्जा ठरवू शकतात. येथे स्टार्स पद्धतीवर कोणत्याही कलाकृतीला रेटिंग दिलं जातं. १० हे सर्वाधिक रेटिंग समजलं जातं. या प्लॅटफॉर्मवर चित्रपट, मालिका, बेस सिरीज, व्हिडिओ गेम्स अशा सर्वच गोष्टींना रेटिंग देता येतं.