सोशल मीडियावर बॉलिवूड सेलिब्रिटींचे जितके चाहते असतात तितकेच त्यांना ट्रोल करणारे देखील असतात. सेलिब्रिटी त्यांच्या एखाद्या वक्तव्याने कधी ट्रोल होतील याचा नेम नाही. असचं काहिसं घडलंय बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारसोबत. होळीच्या शुभेच्छा दिल्यानंतर नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला ट्रोल केलं आहे.

अक्षय कुमारने मुलीसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र याचवेळी त्याने चाहत्यांना केलेलं आवाहन नेटकऱ्यांच्या पचनी पडलेलं नाही. अक्षय कुमारने त्याच्या ‘वक्त’ या सिनेमातील गाजलेलं होळीचं गाणं ‘डू मी ए फेव्हर लेटस् प्ले होली’ यातील वाक्य रचना बदलत एक ट्विट केलं आहे. अक्षय कुमारने त्याच्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे. “डू मी ए फेव्हर लेटस् नॉट प्ले होली. तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि तुमच्या प्रियजनांच्या सुरक्षिततेसाठी घरात होळी साजरी करा. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप शुभेच्छा” असं ट्विट करत अक्षयने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षयने त्याच्या ट्विटमध्ये म्हंटलेलं “डू मी ए फेव्हर लेटस् नॉट प्ले होली” म्हणजेच “माझ्यावर उपकार करा होळी खेळू नका” हे वाक्य त्याला महागात पडलंय. नेटकऱ्यांनी यावरून अक्षयला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ट्विटरवर अक्षय ट्रेंडिगमध्ये आला असून सध्या ट्विटरवर #पूर्ण_बहिष्कार_अक्षय_कुमार हा ट्रेंड पाहायला मिळतोय.
एका युजने अक्षयला ट्रोल करत म्हंटल आहे. “कॅनेडियन अक्षय कुमार कूल होण्याचा प्रयत्न करत होता मात्र तो फूल झाला आहे.” अनेकांनी अक्षय कुमारचं नागरिकत्व कॅनडाचं असल्याने तो हिंदू सणांविरोधत बोलत असल्याचं म्हणत त्याला ट्रोल केलं आहे.

तर काही नेटकऱ्यांनी अक्षय कुमारला त्याच्याच शब्दात उत्तर दिलं आहे. एक युजरने म्हंटलं आहे. “होळीच्या शुभेच्छा सर. विनंती आहे तुमच्या, तुमच्या कुटुंबियांच्या आणि सेटवरील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तुमच्या सिनेमाचं, जाहिरातींचं सर्व शूटिंग थांबवा.

तर एका युजरने म्हंटलं आहे. “माझ्यावर उपकार करा सिनेमागृहात जाऊ नका.” अशा प्रकारेच अनेक युजर्सनी उपकार करा सिनेमातगृहात अक्षयचा सिनेमा पाहू नका असं म्हणत ट्रोल केलंय.

एकंदरच अक्षय कुमारने चाहत्यांच्या सुरक्षिततेचा  विचार करत त्यांना दिलेल्या शुभेच्छा आता त्याला महागात पडत आहे. हिंदू सणांविरोधात अक्षयने हे वक्तव्य केल्याचा आरोप त्याच्यावर केला जातोय.