नुकताच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री कियारा अडणवाणी मुख्य भूमिकेत असणारा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय एका ट्रान्सजेंडरची भूमिका साकारणार आहे. पण ट्रेलर प्रदर्शित होताच त्याला किती लाईक्स आणि डिस्लाइक मिळाले हे प्रेक्षकांना पाहता येणार नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकराणानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाही हा वाद पेटून उठला. त्यामुळे स्टारकिड्स आणि बड्या कलाकारांवर जोरदार टीका होत आहे. त्यामुळे सुशांतच्या चाहत्यांनी महेश भट्ट यांचा आगामी चित्रपट ‘सडक २’च्या ट्रेलवर डिसलाइकचा भडिमार केला असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर इशान खट्टरच्या खाली पिली या चित्रपटाच्या ट्रेलवरही डिसलाइकचा भडिमार करण्यात आला.

आता अक्षयचा आगामी चित्रपट ‘लक्ष्मी बॉम्ब’चा ट्रेलर प्रदर्शित होताच यूट्यूबवर त्याचे लाईक्स आणि डिसलाइक हाइड करण्यात आले आहेत. ट्रेलर पाहताना तुम्ही तो लाईक किंवा डिसलाइक करु शकता. पण एकूण किती जणांनी ट्रेलर लाईक किंवा डिसलाइक केला हे हाइड करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच सुशांतच्या चाहत्यांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली होती. कारण अक्षय कुमारने ड्रग्जशी संबंधीत शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बॉलिवूडची बाजू घेतल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यामुळे आता डिसलाइकच्या भीतीने निर्मात्यांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाच्या ट्रेलरचे लाईक्स आणि डिसलाइक हाइड केले असल्याचे म्हटले जात आहे.

येत्या दिवाळीमध्ये लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. राघवा लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि यूएई या देशात काही ठराविक चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. तर भारतीय प्रेक्षकांना हा चित्रपट डिझनी प्लस हॉटस्टारवर पाहता येणार आहे.