‘चौदहवीं का चाँद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो…’ मोहम्मद रफी यांचे हे गाणे, १९६० मध्ये आलेले चौदहवीं का चाँद या सिनेमातले आहे. अभिनेत्री वहीदा रेहमान यांनाही या सिनेमातूनच ओळख मिळाली. वहीदा या शब्दाचा अर्थही ‘लाजवाब’ असाच होतो. आपल्या अभिनयाने पाच दशकाहूनही अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत.

वहीदा यांना लहानपणापासूनच संगीत आणि नृत्य यांची आवड होती. पण त्यांना खरे तर डॉक्टर बनायचे होते. त्यांचा पद्मश्री आणि पद्मभूषण यांसारख्या पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे. नाचणे, गाणे यांसारख्या त्यांच्या आवडींना त्यांच्या आई- वडिलांनी प्रोत्साहन दिले, त्यामुळे त्या स्वतःला नेहमीच भाग्यवान समजतात.

आंध्र प्रदेशच्या विजयवाडा या परंपरागत मुस्लिम कुटुंबात ३ फेब्रुवारी १९३८ मध्ये जन्म झाला. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनीही अनेकदा वहीदा यांचे कौतुक केले आहे. जरी त्यांना आयुष्यात डॉक्टर बनावे असे वाटत असले तरी नशिबात मात्र काही वेगळेच होते. डॉक्टरचे शिक्षण घ्यायला त्यांनी सुरुवातही केली होती, पण मध्येच फुफ्फुसाचा संसर्ग झाल्यामुळे वहीदांचे हे शिक्षण पूर्ण होऊ शकले नाही. त्यांनी भरतनाट्यममध्ये आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी भरतनाट्यमचे अनेक कार्यक्रमही केले. वडिलांच्या निधनानंतर घरात आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्यामुळे वहीदा यांनी मनोरंजन क्षेत्राकडे आपले लक्ष वळवले.

१९५५ मध्ये त्यांनी दोन तेलगू सिनेमात काम केले होते. त्यानंतर काहीच दिवसांनी बॉलिवूडचे अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माता गुरुदत्त यांनी वहीदा यांचे स्क्रीन टेस्ट घेतली आणि १९५६ मधील ‘सीआयडी’ या सिनेमात त्यांना खलनायिकेची भूमिका दिली. या सिनेमानंतर त्यांना अनेक सिनेमे मिळायला सुरुवात झाली. १९५७ मध्ये आलेल्या ‘प्यासा’ या सिनेमात त्या मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसल्या होत्या.

गुरुदत्त आणि वहीदा यांचे प्रेमप्रकरणही चर्चेत होते. १९५९ मध्ये आलेल्या ‘कागज के फूल’ या सिनेमातली अयशस्वी प्रेमकहाणी ही गुरुदत्त आणि वहीदा यांच्या आयुष्यावरच बेतलेली होती. या सिनेमात वहीदा आणि गुरुदत्त यांनीच काम केले होते. यानंतर १९६० मध्ये आलेल्या ‘चौदहवीं का चाँद’ आणि १९६२ मध्ये आलेल्या ‘साहब बीवी और गुलाम’ या दोन्ही सिनेमात गुरुदत्त आणि वहीदा यांनी एकत्र काम केले होते.
वहीदा यांनी आपल्या करिअरची सुरुवात, गुरुदत्त यांच्यासोबत तीन वर्षांच्या करारावर स्वाक्षरी करुन केली होती. या करारात त्यांनी स्पष्ट केले होते की, त्यांच्या पसंतीचेच कपडे त्या घालतील, याशिवाय त्यांना जर कोणता ड्रेस आवडला नाही तर तो घालण्यासाठी जबरदस्तीही कोणी करायची नाही, अशा प्रकराच्या अटी या करारात होत्या.

गुरुदत्त यांनी १० ऑक्टोबर १९६४ मध्ये आत्महत्या केली होती. त्यानंतर वहीदा एकट्याच झाल्या. पण या कठीण काळातही त्यांनी आपल्या कामाकडे दुर्लक्ष केले नाही. राज कपूर यांच्या ‘तीसरी कसम’ या सिनेमात नाचणाऱ्या हीराबाईची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यानंतरही त्यांनी अनेक सिनेमात काम केले. १९६५ मध्ये आलेल्या ‘गाईड’ या सिनेमातल्या अभिनयासाठी वहीदा यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीला लोकसत्ता ऑनलाइनकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.