सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचं शुक्रवारी पहाटे निधन झालं. त्या ७१ वर्षांच्या होत्या. कार्डिअॅक अरेस्टमुळे त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूड सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांनी ऑनलाईन ब्लॉगच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सरोज खान यांनी उत्तम डान्स केल्याबद्दल बिग बींना एक रुपयाचं नाणं दिलं होतं. तो किस्सा सांगून त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे.
काय म्हणाले अमिताभ बच्चन?
“सरोज खान यांच्यासोबत चांगलं काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला त्या काहीना काही बक्षिस द्यायच्या. तो अविस्मरणीय क्षण माझ्याही आयुष्यात आला होता. एका गाण्यात चांगला डान्स केल्याचं बक्षिस म्हणून त्यांनी मला एक रुपयांचं नाणं दिलं होतं. मी चांगला डान्सर नाही पण ते नाणं आजही मला प्रोत्साहन देण्याचं काम करतं.” अशा आशयाचा ब्लॉग लिहून त्यांनी बिग बींनी आपलं दु:ख व्यक्त केलं. त्यांचा हा ब्लॉग सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
गेल्या बऱ्याच काळापासून सरोज खान बॉलिवूडपासून दूर होत्या. परंतु २०१९ मध्ये मल्टिस्टारर चित्रपट ‘कलंक’ आणि कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटात एक गाणं कोरिओग्राफ केलं होतं. सरोज खान या हिंदी सिनेसृष्टीतल्या नावाजलेल्या कोरिओग्राफर होत्या. एक दो तीन.. हे गाणं असो किंवा हमको आज कल है इंतजार.. या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. इतकंच नाही तर चोली के पिछे क्या है.. निंबुडा निंबुडा, डोला रे डोला या गाण्यांचंही नृत्य दिग्दर्शन सरोज खान यांनी केलं. मिस्टर इंडिया, चांदनी, बेटा, तेजाब, नगिना, डर, बाझीगर, अंजाम, मोहरा, याराना, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, देवदास, ताल, फिजा, स्वदेस, तनू वेड्स मनू, एजंट विनोद, रावडी राठोड, मणिकर्णिका, या आणि अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांसाठी त्यांनी नृत्य दिग्दर्शन केलं होतं.