बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन, वरुण धवन आणि चित्रपटसृष्टीतील अन्य काही जणांनी भारतीय फलंदाज युवराज सिंगला टि्वटरच्या माध्यमातून समर्थन दर्शविले आहे. आयसीसी वर्ल्ड कप टी-20 च्या श्रीलंकेबरोबरच्या अंतिम सामन्यात भारताला हार स्वीकारावी लागली. युवराज सिंगला यासाठी दोषी धरून चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर गोंधळ घालून आपला रोष व्यक्त केला. काही तासांत श्रीलंकेकडून भारताचा सहावा फलंदाज बाद होताच युवराज सिंगच्या चंदीगढ येथील घरावर दगडफेक करण्यात आली आणि टि्वटरवरदेखील त्याचे नाव सर्वात जास्त ट्रेन्ड होत होते.
युवराज सिंगच्या समर्थनार्थ सरसावलेले बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे की, ठीक आहे… तर टी-20 वर्ल्ड कपच्या आज रात्रीच्या अंतिम सामन्यात आपण श्रीलंकेबरोबर हारलो… होय हे खचितच निराशाजनक आहे, परंतु जगातील दर्जेदार संघाविरुद्ध खेळत आपला संघ आणि खेळाडू अंतिम सामन्यापर्यंत पोहोचले याचा अभिमान आहे… आज आपला दिवस नव्हता आणि उत्कृष्ट संघ जिंकला एव्हढेच… श्रीलंकेचे अभिनंदन, जे खरोखर चांगले खेळले…
युवराज सिंगच्या घरावर लोकांनी केलेल्या दगडफेकीमुळे व्यथित झालेला अभिनेता वरुण धवन टि्वटरवरील आपल्या संदेशात म्हणतो, लोक युवीच्या घरावर दगड फेकत असल्याचे समजले. हे मुर्खपणाचे आणि अपरिपक्वपणाचे लक्षण आहे. तो एक सच्चा खेळाडू आहे. युवीने आपल्याला वर्ल्ड कप मिळवून दिला आहे, स्वत: कॅन्सरशी झुंजत असताना त्याने आपल्याला आनंद दिला. लोक हे कसे विसरू शकतात. टि्वटरवरील आपल्या संदेशात तो पुढे म्हणतो, क्रिकेटमध्ये तुम्ही कधी जिंकता तर कधी हारता, फक्त मान्य करा की आज लंका चांगली खेळली.
टि्वटरवरील संदेशात अरबाझ खान म्हणतो, युवी मॅचविनर राहिला आहे, काल त्याचा दिवस नव्हता, दुर्दैवाने तो वर्ल्ड कपचा अंतिम सामना होता. अद्यापही तो महान खेळाडू आहे. दिग्दर्शक मधुर भंडारकर म्हणतो, कोण आहेत हे मुर्ख जे सामना हरल्यामुळे दगडफेक करीत आहेत? आपण विसरलो का तो युवराजच @YUVSTRONG12 होता ज्याने आपल्याला दोन्ही वर्ल्ड कप जिंकून दिले? डिनो मोरयो लिहितो, खरचं??? या लोकांना शहाणे होण्याची गरज आहे. शुद्ध मूर्खपणा. युवराज सिंगने २१ चेंडूत ११ धावा बनविल्या, टी-20 सामन्यात संथगतीने धावा करणारा तो तिसरा फलंदाज ठरला आहे.