बहुचर्चित ‘जीएसटी बिला’चे विधायक काल राज्यसभेत पास झाले. २०१७ पासून लागू होणाऱ्या या विधेयकाला आणखी बऱ्याच प्रिक्रियांचा टप्पा पार करायचा आहे अशी माहिती मिळते. दरम्यान, बुधवारी राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळताच सोशल मीडियावर हा विषय क्षणार्धातच ट्रेंडमध्ये आला. ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर अनेकांनी ट्विट करत या ‘जीएसटी बिला’चे स्वागत केले आहे. देशातल्या राजकीय पटलासह सिनेवर्तुळातही ‘जीएसटी’ चे वारे वाहत आहेत.
बी टाऊनच्या काही प्रसिद्ध कलाकारांनी या विधेयकाशी निगडीत ट्विट करत तेही या ट्रेंडचा भाग झाले आहेत असेच म्हणावे लागेल. फेसबूकवर २.४ कोटी फॉलोअर्सचा आकडा पार करणाऱ्या अमिताभ बच्चन यांनीही या विधेयकाबद्दल ट्विट केले आहे. ‘लांबलचक चर्चांनंतर शेवटी जीएसटी पास झाले, ठाऊक नाही हे काय आहे, पण याविषयी सारेच उत्साही आहेत’ असे ट्विट बच्चन यांनी केले आहे. शाहरुख खाननेदेखील जीएसटीबाबतचे आपले मत टि्वटरवर मांडले आहे. ‘आर्थिक गोष्टींची मला जास्त माहिती नसते, पण देशाची क्षमता वाढवण्यासाठी जीएसटी एक चांगले पाऊल आहे, सर्वांना याबद्दल अभिनंदन’ असे ट्विट किंग खानने केले आहे. दरम्यान, राज्यसभेत मंजुरी मिळाल्यानंतर या विधेयकाचा प्रवास आता पुन्हा लोकसभेच्या दिशेने होणार असून त्यानंतर राष्ट्रपतींच्या संमतीनंतरच हे विधेयक देशात लागू करण्यात येणार आहे. कर वसुली, व्यवसाय पद्धतींमध्ये सुसुत्रता आणत सकल राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करण्यासाठी या विधेयकाचे पाचरण करण्यात आले आहे.