यंदाच्या बाफ्टा पुरस्कार सोहळ्यातील माहितीपट विभागासाठीच्या पुरस्कारांवर आशियाई माहितीपटांचे वर्चस्व दिसून आले. बाफ्टा पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आलेले पाचपैकी तीन माहितीपट आशियातील परिस्थितीवर भाष्य करणारे होते. यापैकी ‘अॅमी’ या माहितीपटाने सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा मान पटकावला. हा माहितीपट भारतीय वंशाची दिवंगत गायिका अॅमी विनहाऊस हिच्या जीवनावर आधारित आहे. लंडनस्थित भारतीय वंशाचा मुस्लिम दिग्दर्शक आसिफ याने हा माहितीपट तयार केला आहे. आसिफच्या यापूर्वीच्या हिमालय आणि राजस्थानमध्ये चित्रित करण्यात आलेल्या ‘द वॉरियर’ या चित्रपटाचेही समीक्षकांनी कौतूक झाले होते. २००३मध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट ब्रिटीश चित्रपटाचा मान मिळवला होता. दरम्यान, हा पुरस्कार स्विकारताना आसिफ कपाडियाने या सर्व यशाचे श्रेय अॅमीला दिले. ‘अखेर हे सगळे अॅमीबद्दलच होते’, अशा शब्दांत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. अॅमी विनहाऊस या लोकप्रिय गायिकेचा २०११ मध्ये वयाच्या २७व्या वर्षी मद्य आणि ड्रग्जच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. ‘अॅमी’ यंदा ऑस्करच्या स्पर्धेतही आघाडीवर आहे. याशिवाय, अन्य माहितीपटांमध्ये पाकिस्तानमधील सामाजिक कार्यकर्ती आणि सर्वात लहान नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफझाई हिच्या जीवनावर आधारित ‘हि नेम्ड मी मलाला’ या माहितीपटाचा समावेश होता. डेव्हिड गगेनहेम, वॉल्टर पार्कस आणि लौरी मॅकडोनाल्ड दिग्दर्शित या माहितपटात पाकिस्तानच्या स्वात खोऱ्यातील मलाला युसूफझाईचा मुलींच्या शिक्षणासाठीचा लढा, तिच्यावर तालिबानी अतिरेक्यांकडून करण्यात आलेला हल्ला या घटनांचे चित्रण करण्यात आले आहे. याशिवाय, २०१३ मध्ये एव्हरेस्ट मोहिमेदरम्यान युरोपीय गिर्यारोहक आणि शेरपा यांच्यात उद्भवलेल्या वादाचे प्रसारमाध्यमांकडून करण्यात आलेल्या वृत्तांकनावर आधारित माहितीपटही पुरस्काराच्या शर्यतीत होता. या माहितीपटाच्या रंजक सादरीकरणाने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते.