अभिनेते अनुपम खेर यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या दमदार अभिनयाची जादू फक्त भारतातच नव्हे तर थेट सातासमुद्रापार पोहोचली आहे. न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘हॅपी बर्थडे’ या शॉर्ट फिल्मसाठी त्यांना ‘बेस्ट अ‍ॅक्टर’चा पुरस्कार मिळालाय.

बेस्टअ‍ॅक्टरचा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटकरून आपला आनंद व्यक्त केला. या ट्विटमध्ये अभिनेते अनुपम खेर यांनी लिहिलं की, इतक्या मोठ्या सन्मानासाठी न्यूयॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे खूप खूप आभार…या फिल्म फेस्टीव्हलमध्ये बेस्ट अ‍ॅक्टर म्हणून माझा गौरव होणं ही माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे…याचं सगळं श्रेय ‘हॅपी बर्थडे’ च्या सगळ्या टीमला तसंच माझी सहकलाकार अभिनेत्री अहाना कुमरा यांना जातं. दिग्दर्शक प्रसाद कदम, पटकथाकार , प्रॉडक्शन टीम आणि सगळ्यांचे खूप खूप आभार.”


अभिनेते अनुपम खेर यांच्या ‘हॅपी बर्थ डे’ या शॉर्टफिल्मचं भरभरून कौतूक होतंय. ‘हॅपी बर्थ डे’ या शॉर्ट फिल्मला न्यू यॉर्क सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘बेस्ट फिल्म’ हा पुरस्कार सुद्धा मिळालाय. एकाच फिल्मसाठी दोन पुरस्कार मिळाल्यामुळे निर्माता गिरीश जौहर यांनीही आनंद व्यक्त केला. अनुपम खेर हे एक ग्लोबल आयकॉन आहेत. आहना यांनाही नामांकन मिळाले होते. सर्वांनीच आपापल्या परीने उत्तम कामगिरी केली; असे गिरीश जोहर म्हणाले.

काही दिवसांपूर्वी अभिनेते अनुपम खेर त्यांच्या एका ट्विटमुळे नेटकऱ्यांचे टार्गेट बनले होते. करोना हे एक संकट आहे आणि या संकटाचा सामना भारत सरकार समर्थपणे करत आहे. कोणी काहीही म्हणाले तरी येणार तर मोदी असं त्यांनी या ट्विटमध्ये लिहिलं होतं. या ट्विटमुळे सोशल मीडियावर ते चांगलेच ट्रोल झाले होते.