कमी वयात आणि कमी वेळात चित्रपटसृष्टीत आपलं स्थान कायम करणाऱ्या अभिनेत्री अनुष्का शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाच तुरा रोवला जाणार आहे. दादासाहेब फाळके या प्रतिष्ठित पुरस्काराने अनुष्काचा गौरव करण्यात येणार आहे. अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातील अभूतपूर्व कामगिरीबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

भाऊ कर्नेश शर्मासोबत तिनं ‘क्लिन स्लेट फिल्म्स’द्वारे निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. या प्रॉडक्शन हाऊसअंतर्गत निर्मिती झालेला पहिला चित्रपट ‘एनएच १०’ बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजला. वयाच्या २५व्या वर्षी अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर असतानाच तिने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. ‘एनएच १०’नंतर ‘फिलौरी’ आणि ‘परी’ या दोन चित्रपटांची निर्मिती तिने केली. बॉक्स ऑफीसवर या दोन चित्रपटांना फारशी दाद मिळाली नसली तरी अनुष्काने हा प्रवास थांबवला नाही.

PHOTOS : सुवर्णमध्य साधणारा ‘स्टायलिश स्टार’

अनुष्का आणि कर्नेशने त्यांच्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून नव्या प्रतिभांना संधी दिली. दिग्दर्शक, संगीतकार, तंत्रज्ञ असा विविध क्षेत्रात नव्या लोकांना कामाची संधी दिली. एकंदरीत तिच्या या कामगिरीची दखल घेत दादासाहेब फाळके या पुरस्काराने तिला गौरविण्यात येणार आहे.

अनुष्का सध्या तिच्या आगामी ‘सुई धागा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असून यामध्ये ती वरुण धवनसोबत भूमिका साकारत आहे. या चित्रपटानंतर ‘क्लिन स्लेट फिल्म्स’ अंतर्गत आणखी तीन पटकथांसंदर्भात ती काम सुरू करणार आहे.