News Flash

‘तीच मजा पुन्हा एकदा..’

बॉलीवूडची ही सम्राज्ञी पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात सक्रिय झाली आहे. त्या निमित्ताने तिच्याशी साधलेला संवाद..

(संग्रहित छायाचित्र)

बॉलीवूडमध्ये मराठी ठसा उमटविणाऱ्या माधुरी दीक्षितचा ‘कलंक’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाच्या निमित्ताने तिने मराठी रुपेरी पडद्यावर प्रवेश केला. छोटय़ा पडद्यावर ‘डान्स दिवाने’, ‘झलक दिखला जा’, ‘सो यू थिंक यू कॅन डान्स’ अशा रिअ‍ॅलिटी शोमधून परीक्षक म्हणूनही तिचा सहभाग होता. ‘१५ ऑगस्ट’ या चित्रपटाची निर्माती म्हणून माधुरी निर्मिती क्षेत्रात उतरली.  बॉलीवूडची ही सम्राज्ञी पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात सक्रिय झाली आहे. त्या निमित्ताने तिच्याशी साधलेला संवाद..

‘कलंक’ चित्रपटातील ‘तबाह हो गये’ हे गाणं सध्या लोकप्रिय झालं असून या गाण्याच्या निमित्ताने माधुरीने पुन्हा एकदा नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांच्याबरोबर काम केलं आहे. त्याविषयी माधुरी म्हणाली, सरोज खान यांच्याबरोबर काम करतानाचा अनुभव नेहमीच छान असतो. त्यांच्याबरोबर मी अनेक गाणी केली आणि ती खूप लोकप्रियही झाली. आमची जोडी छान जमली आहे. ‘तबाह हो गए’ हे गाणं जेव्हा ऐकलं तेव्हा या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन सरोज खान यांनीच करावं, असं वाटलं होतं आणि पुढे ते प्रत्यक्षात साकारलं. ‘कलंक’ चित्रपटाची भव्यता पाहून त्याची तुलना संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटांशी केली जात आहे. अशा प्रकारची भव्यता पाहून त्यांच्या चित्रपटांशी तुलना होणं हे साहजिक आहे. अशा प्रकारच्या सेट्सची भव्यता ही भन्साळी यांचीच शैली आहे. त्यामुळे ‘कलंक’ची त्यांच्या चित्रपटांशी तुलना केली जाणारच. पण ‘कलंक’ चित्रपट वेगळा असून या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेचं एक रहस्य आहे. त्या रहस्याच्या भोवती सेट्सची रचना केली आहे. अनेक वर्षांनंतर अनिल कपूर आणि संजय दत्त यांच्या बरोबर काम केलं आहे. आत्ता त्यांच्यासमवेत काम करताना मला जुन्या दिवसांची आठवण झाली. या दोघांबरोबर मी अनेक चित्रपट केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकत्र काम करताना तीच मजा अनुभवता आली.

‘कलंक’ चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि ‘डेढ इश्किया’मधील व्यक्तिरेखा वरून यामध्ये त्यातल्या उर्दू लहेजामुळे साधम्र्य दिसतं. चित्रपटात काम करायला सुरुवात केली तेव्हा ‘मुघल-ए-आझम’ हा माझा अतिशय आवडता चित्रपट होता. या चित्रपटातील संवाद अप्रतिमरीत्या सादर झाले आहेत. मलाही तशाच प्रकारे संवाद सादरीकरण करायचं होतं. मला ते शिकून घ्यायचं होतं. उर्दू भाषा खूप काव्यात्मक आहे. एका ऊर्दू शिक्षकांकडून उर्दू भाषेचं शिक्षण घेतलं होतं. त्याचा फायदा या व्यक्तिरेखा साकारताना होतो. ‘डान्स विथ माधुरी’ हा कार्यक्रम मी ऑनलाइन करत होतेच. त्यामुळे निर्मिती संस्था तेव्हापासूनच स्थापन केली होती. मराठी भाषेत माझी मुळं रुजलेली असल्याने मराठी चित्रपटाची निर्मिती करताना अभिमान वाटतो. भाषा म्हणून मराठी माझ्या ह्रदयाशी जोडली गेली असल्याचं माधुरीनं एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं.

आतापर्यंत स्वीकारलेल्या आणि साकारलेल्या भूमिकांविषयी तिला विचारले असता माधुरी म्हणाली, आजपर्यंत मला खूप छान भूमिकांसाठी विचारणा झाली. त्याबद्दल मी आनंदी आहे. चित्रपटांध्ये नायकाला कुठल्याही वयात चांगल्या भूमिका मिळतात पण नायिकांना मात्र मिळत नाहीत. पण अभिनेत्री म्हणून असा अनुभव मला कधीच आला नाही उलट वेगवेगळ्या टप्प्यावर वैविध्यपूर्ण भूमिका साकारता आल्या. ‘बेटा’, ‘दिल’ हे चित्रपट केल्यानंतर मी ‘मृत्युंदड’ सारखा चित्रपट केला. जेव्हा अन्य अभिनेत्री व्यावसायिक चित्रपट करण्याकडे लक्ष देत होत्या तेव्हा मी मात्र भूमिकांकडे लक्ष दिलं. चित्रपटातील गाणी आणि नृत्य ही बॉलीवूडची ओळख आहे. मराठी चित्रपटांत नेहमीच आशयाला प्राधान्य देण्यात आलं आहे. बॉलीवूडमध्ये एका बाजूला आशयघन दुसऱ्या बाजूला फक्त मनोरंजन करणारेही चित्रपट येतात. त्यामुळे मला सगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळाल्या याचा आनंद आणि समाधान आहे.

हे वर्ष माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ‘टोटल धमाल’ला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं. ‘कलंक’ हाही चांगला चित्रपट आहे. ‘१५ ऑगस्ट’ हा आमचा चित्रपट जगभर पसरलेल्या चित्रपट रसिकांचे ‘नेटफ्लिक्स’च्या माध्यमातून मनोरंजन करत आहे. मराठीबरोबरच तो हिंदी भाषेतही डब झाला आहे. ‘डान्स दिवाने’ कार्यक्रमाचंही दुसरं पर्व येणार आहे. यंदाच्या वर्षांची ही खूप चांगली सुरुवात आहे. आमच्या निर्मितीसंस्थेतर्फे तरुणांसाठी खास काही तरी घेऊन येणार आहे.

– माधुरी दीक्षित

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 12:38 am

Web Title: article on madhuri dixit 15 august movie
Next Stories
1 नव्या विचारांचा ‘कागर’
2 ‘‘knock‘! ‘knock‘! सेलिब्रिटी!’ : नितांतसुंदर कथानुभव
3 वेबबाला : भारतीय अवतारातील क्रिमिनल जस्टिस
Just Now!
X