बिग बॉस या रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकलेली अभिनेत्री कोयना मित्रा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने राम मंदिराच्या मुद्द्यावरुन एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात ट्विट केले आहे. या वादग्रस्त ट्विटमुळे कोयना मित्रा सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेत आहे.

अयोध्या प्रकरणाचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. वादग्रस्त जागी राम मंदिर होईल, तर मशिदीसाठी पर्यायी पाच एकरची जागा देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. या निकालाशी सहमत नसलेल्या असदुद्दीन ओवेसी यांनी “मला माझी मशीद परत हवी आहे” असे ट्विट केले होते. या ट्विटवर प्रतिक्रीया देताना “मला आमची ४० हजार मंदिरे परत हवी आहेत.” असे ट्विट कोयना मित्रा हिने केले.

कोयनाने ओवेसींविरोधात केलेले हे ट्विट सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चेत आहे. काही तासात तब्बल २१ हजार पेक्षा अधिक नेटकऱ्यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी कोयनाची स्तुती केली तर काहींनी तिच्यावर टीका देखील केली आहे. ओवेसींच्या ट्विटनंतर ‘#ओवैसी_भारत_छोड़ो हा ट्रेंड ट्विटरवर सुरु झाला होता.