सत्तर-ऐंशीच्या दशकांत देशातील कामगार चळवळ ऐन भरात होती. कामगार-मालक संघर्षांमुळे संप, घेराव, निदर्शने, मोर्चे, टाळेबंदी, कारखाने बंद पडणे या गोष्टी नित्याच्या झाल्या होत्या. आणीबाणीने या सर्वावर गदा आणली आणि देशात अनुशासन पर्व सुरू झाले. त्यामुळे हे सारे सरकारी दडपशाहीने दडपले गेले. याचा अर्थ असंतोष शमला होता असा मात्र नाही. आणीबाणी उठताच तेच चक्र पुन्हा सुरू झाले. दरम्यान १९८२ साली मुंबईत झालेल्या सार्वत्रिक गिरणी संपाने कामगारांचे पार कंबरडेच मोडले आणि देशातील कामगार चळवळीला शेवटची घरघर लागली. पुढे नव्वदीच्या दशकात जागतिकीकरण आणि खुल्या आर्थिक धोरणामुळे कामगार-मालक यांच्यातले नाते आमूलाग्र बदलले. सर्वत्र कंत्राटदारी पद्धती अस्तित्वात आली. कामगारांच्या मानेवर कायमची टांगती तलवार आली. त्यांना उत्पादकतेशी निगडित वेतन मिळू लागले. परिणामी संप, टाळेबंदी, कारखाने बंद पडणे वा पाडणे या गोष्टी इतिहासजमा झाल्या. याचा दुसरा परिणाम असा झाला, की सर्वच कामगार वेठबिगार झाले. त्यांच्या मुसक्या कंत्राटी पद्धतीमुळे बांधल्या गेल्याने आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढणेही त्यांना आता दुरापास्त झाले आहे. ही एक नवी शोषणव्यवस्थाच अस्तित्वात आली आहे. ‘हायर अॅण्ड फायर’ तत्त्वामुळे कामगार-मालक संबंधांतली ‘माणुसकी’ संपली आहे. या पाश्र्वभूमीवर जुन्या पठडीतील कामगार-मालक संघर्ष चितारणारे वसंत कानेटकर यांचे ‘बेइमान’ हे नाटक आज तसे संदर्भहीन झाले आहे. तरीही ‘सुयोग’ संस्थेने आजच्या काळात ते का रंगभूमीवर आणले असावे असा प्रश्न पडतो.   
हे नाटक वरकरणी कामगार-मालक हितसंबंधांतील संघर्षांवर आधारीत असले तरी लेखकाने ते दोन पातळ्यांवर खेळवलं आहे. त्यात आणखीन एक समांतर धागा  गुंफला आहे. दोन मित्रांतील अतुट भावबंध आणि परिस्थितीवश त्यांच्यात निर्माण झालेले वैर- हा तो धागा. उद्योगपती धनराजचा जीवश्चकंठश्च मित्र आणि त्याच्याच घरी लहानाचा मोठा झालेला बुद्धिमान वकील चंदर हा खरे तर त्याच्या वतीने त्याच्या उद्योगांचा कारभार पाहत असतो. त्यामुळे धनराज ऐषोरामात गुलछर्रे उडवू शकतो. उद्योगाशी संबंधित बाबी साम-दाम-दंड-भेद असे सारे मार्ग चोखाळून चंदर हाताळत असतो. कामगार नेते स्वामी अभयानंद हे अत्यंत समर्पित, तत्त्वनिष्ठ व्यक्तिमत्त्व. परंतु त्यांच्या परोक्ष त्यांचे कॉम्रेड सहकारी अचानक संप पुकारतात व अडचणीत येतात. मालकापुढे नाक घासत टाळेबंदी उठवायची विनंती करण्याविना त्यांच्यासमोर पर्याय उरत नाही. चंदर याचा फायदा न उठवेल तरच आश्चर्य! कामगारांना संप बिनशर्त मागे घ्यायला लावून तो त्यांना शरण आणतो. त्यासाठी त्याने अचूक वेळ साधलेली असते. कारण स्वामी अभयानंद तेव्हा तिथे नसतात. त्यांच्या सहकाऱ्यांना स्वार्थाची गाजरं दाखवून चंदर त्यांना विकत घेतो.  
दरम्यान स्वामी अभयानंद परत येतात. आपल्या सहकाऱ्यांनी कामगारांचा विश्वासघात  केल्याचे त्यांना कळते. परंतु ते हार मानत नाहीत. आपल्या कामगारांवर त्यांचा विश्वास असतो. त्या बळावर आपण धनराज उद्योगसमूहात सार्वत्रिक संप घडवून मालकाची नाकेबंदी करू शकतो, हा त्यांना विश्वास असतो. मात्र, चंदरसारखा इमानी, तत्त्वनिष्ठ माणूस आपल्या संघटनेस मिळाला तर किती बरे होईल, हाही विचार त्यांच्या मनात तरळून जातो. ते चंदरपाशी आपली ही इच्छा बोलून दाखवतात. चंदरला त्याचं भलतंच आश्चर्य वाटतं. हे कसं काय शक्य आहे?
पुढे स्वामी अभयानंद अकाली जातात आणि चंदर या संधीचा लाभ उठवून त्यांची भव्य अंत्ययात्रा काढतो, त्यांचा पुतळा उभारतो; जेणेकरून कामगारांना मालकांबद्दल आत्मीयता वाटेल. धनराजने स्वामी अभयानंदांचं चंदरबद्दलचं मत ऐकलेलं असतं. त्यामुळे तो एक योजना आखतो. स्वामी अभयानंदांच्या जागी कामगार नेता म्हणून चंदरला प्रस्थापित करून आपल्याला हवं ते साध्य करायचं! चंदर या योजनेला तीव्र विरोध करतो. धनराजला यातले धोके दाखवून देतो. आपण एकदा का कामगार नेता झालो, की धनराजचे हितसंबंध जपणं आपल्याला शक्य होणार नाही, हे तो परोपरीनं धनराजला समजावू पाहतो. पण धनराज त्याचं काहीएक ऐकत नाही.
धनराजच्या योजनेनुसार चंदर हळूहळू कामगारांचा विश्वास संपादन करून त्यांचा नेता बनतो. चंदर करेल ती प्रत्येक मागणी धनराज मान्य करत जातो. त्यामुळे चंदरचं नेतृत्व प्रस्थापित होतं. आता चंदरने आपल्या या औदार्याची परतफेड धनराज उद्योगसमूहातील एका कारखान्यात कामगार कपातीला मान्यता देऊन करावी, असा प्रस्ताव धनराज चंदरसमोर ठेवतो. परंतु चंदर त्यास स्पष्ट नकार देतो. धनराजकरता हा जबर धक्का असतो. आपला जीवश्चकंठश्च मित्र आपल्यावर असा उलटेल हे त्याने स्वप्नातही कल्पिले नव्हते.
चंदरचा दुस्वास करणारे बोर्ड ऑफ डिरेक्टर्सचे सदस्य आणि धनराजची पत्नी धनवंती यावरून धनराजला चांगलंच सुनावतात. चंदर विश्वासघातकी असल्याचे त्याला सांगतात. पण आपल्या मैत्रीत हे लोक बिब्बा घालू इच्छितात असं धनराजला नेहमी वाटत आलेलं असतं. मात्र, आता त्यांचंच म्हणणं खरं होताना दिसत होतं. चंदर बेइमान झाला होता. धनराज या विश्वासाघातानं संतापतो. चंदरला त्याचा जाब विचारतो. तेव्हा चंदर त्याला स्पष्टपणे सांगतो की, ‘मी तुला आधीच सावध केलं होतं. तू मला कामगार नेता बनायला भाग पाडू नकोस. मी एकाच वेळी तुझे आणि कामगारांचे हितसंबंध सांभाळू शकणार नाही. मी ज्याच्या बाजूने असेन त्यांचंच हित सांभाळणं हे माझं परमकर्तव्य असेल. आणि ते मी सर्वस्वानं बजावेन.’
धनराज काहीच ऐकून वा समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसतो. तो चंदरला संपवायचा निर्धार करतो. त्याच्या सहकाऱ्यांना आडमार्ग वापरून आपल्या बाजूने वळवतो. कामगारांतही त्याच्याबद्दल असंतोष पसरवतो. कामगारांनीच चंदरला धुळीस मिळवावं अशी व्यूहरचना करतो.
पण..
वसंत कानेटकरांचं हे नाटक अत्यंत बेतलेलं, वरवरचं व उथळ आहे. यात शाश्वत काय असेल, तर ती केवळ धनराजच्या बाजूने चंदरची यारी-दोस्ती! मैत्रीसाठी जीव ओवाळून टाकणारी ‘लव्हेबल रास्कल’ प्रकारातली धनराज ही व्यक्तिरेखा आणि तत्त्वांसाठी प्रसंगी मित्रालाही दुखवायला कमी न करणारा तत्त्वनिष्ठ, प्रामाणिक चंदर. या दोन पात्रांमुळेच हे नाटक सुसह्य़ होतं. बाकी सगळी ‘स्टॉक’ पात्रं आहेत. त्यांचे स्वभाव, वागणं-बोलणं, लकबी सारंच ढोबळ, बटबटीत आहे. नाटकातला कामगार-मालक संघर्ष हा निव्वळ पाश्र्वभूमी पुरवतो. कानेटकरांना खरी गोष्ट सांगायचीय ती दोन मित्रांची.. त्यांच्यातल्या विरोधाभासी मैत्रीची! आज हे नाटक प्रेक्षकाला फक्त याच मुद्दय़ावर धरून ठेवू शकतं. अन्यथा हे नाटक कालबाह्य़ झालेलं आहे. यात मानवी मूल्यांचा जो गजर लेखकाने केला आहे, तो आजच्या व्यक्तिकेंद्री, स्वार्थी जगात अत्यंत महत्त्वाचा आहे. केवळ यासाठीच या नाटकाचं आजच्या काळात स्वागत करायला हवं.
दिग्दर्शक मंगेश कदम यांनी हाच मुद्दा प्रयोगात अधोरेखित केला आहे. कानेटकरी अलंकारिक संवाद, स्वगतं, घटनाक्रमातले योगायोग याकडे प्रेक्षकांचं लक्ष फारसं वेधलं जाऊ नये याची खबरदारी त्यांनी घेतली आहे. परंतु जिथे त्यांचा अगदीच नाइलाज झाला आहे तिथे (चंदरची स्वगतं!) त्यांनी त्यांचा आधार घेतला आहे. चंदरची तत्त्वनिष्ठा, प्रामाणिकपणा त्याच्या वागण्यातून व्यक्त होत असला तरी धनराजबद्दलचं त्याचं प्रेम व आपुलकी मात्र त्या प्रमाणात त्याच्याकडून व्यक्त होत नाही. त्यासाठी दिग्दर्शकाला स्वगतांचाच आधार घ्यावा लागला आहे. मंगेश कदम यांनी प्रयोग अतिशय चोख बसवला आहे. सत्तरच्या दशकाची वातावरणनिर्मिती प्रदीप मुळ्ये यांच्या नेपथ्यातून झाली आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना, अशोक पत्की यांचं भावानुकूल संगीत आणि अशोक शिरसाट यांनी रंगभूषेतून पात्रांना दिलेला बाह्य़ चेहरा यांनी प्रयोगमूल्यांत उचित भर घातली आहे.
यातला शरद पोंक्षे यांनी साकारलेला धनराज संस्मरणीय आहे. त्याचा संशयी, विलासी, उच्छृंखल; परंतु मैत्रीत सर्वस्व उधळणारा धनराज पाहणं, हा एक खास अनुभव आहे. धनराजच्या साऱ्या ‘अतिरेकी’ छटा त्यांनी प्रत्ययकारीतेनं साकारल्या आहेत. तुषार दळवींचा धीरोदात्त, बुद्धिमान, प्रसंगावधानी, तत्त्वनिष्ठ आणि कमालीचा प्रामाणिक चंदर हे दुसरं टोक आहे. चंदरची विरागी वृत्ती भगवी कफनी परिधान करण्याआधीपासूनच या व्यक्तिरेखेत मौजूद आहेच. तुषार दळवींनी चंदरचा अलिप्तपणा व ठामपणा ठाशीवपणे व्यक्त केला आहे. शीतल क्षीरसागर यांना धनवंतीच्या भूमिकेत फारसा वाव नव्हता; परंतु तरीही त्या छोटय़ाशा भूमिकेतही लक्ष वेधतात. अजय टिल्लू, प्रदीप प्रधान, सुरेश सरदेसाई, अरुण शेलार, वसंत इंगळे, विवेक जोशी यांनीही आपली कामं चोख केली आहेत.