News Flash

खुसखुशीत रहस्यमय ‘भो भो’

श्वानप्रेम आणि रहस्यमय चित्रपट या दोन अत्यंत वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादा श्वान हा रहस्यमय कथेचा भाग असू शकतो

श्वानप्रेम आणि रहस्यमय चित्रपट या दोन अत्यंत वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखादा श्वान हा रहस्यमय कथेचा भाग असू शकतो, मात्र त्याला थेट गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभं करून माणसाचे क्रौर्य, त्याच्या दुटप्पी वृत्तीवर शरसंधान करण्याचा उत्तम प्रयत्न दिग्दर्शक भरत गायकवाड यांनी ‘भो भो’ चित्रपटातून केला आहे. या चित्रपटाचा नायक खासगी गुप्तहेर आहे आणि या भूमिकेत अभिनेता प्रशांत दामले असल्याने हा रहस्यमय चित्रपट तितकाच खुसखुशीतही झाला आहे.

रहस्यमय चित्रपटाची कथा अनेकदा ठरीव ठोकताळ्यांवर बांधलेली असते. ‘भो भो’ची सुरुवातच एका अनाकलनीय प्रसंगाने होते. एका महिलेचा खून झाला आहे आणि तो तिच्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला के ल्यामुळे झाला आहे. त्यामुळे भांडारकर कुटुंबातील या महिलेच्या हत्येप्रकरणी तिचा कुत्रा सँडी (लॅब्रेडॉर) गुन्हेगार ठरला आहे. सरकारी इस्पितळात मालकिणीवर हल्ला करणाऱ्या या वेडय़ा किंवा पिसाळेल्या कुत्र्याला बांधून ठेवलं आहे. हा कुत्रा वेडा आहे आणि त्याभरात त्याने मालकिणीवर हल्ला केला हे सिद्ध झाले तर भांडारकर कुटुंबाला म्हणजेच खून झालेल्या महिलेचा पती विनायक भांडारकर (सुबोध भावे) याला विम्याची खूप मोठी रक्कम मिळणार आहे. इथे विमा कंपनीसाठी या प्रकरणाची चौकशी करणारा खासगी गुप्तहेर व्यंकटेश भोंडे (प्रशांत दामले) यांचा प्रवेश होतो. व्यंकटेश भोंडेच्या चाणाक्ष नजरेतून या प्रकरणाचा माग काढत कथेच्या रहस्यात प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा चित्रपट केवळ रहस्यपट उरत नाही. श्वानप्रेमींसाठी हा चित्रपट खऱ्या अर्थाने पर्वणी आहे. किंबहुना, त्यांच्या भावना या चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे पोहोचवण्यात दिग्दर्शकाला यश आले आहे. ‘भो भो’ हा नावाप्रमाणेच श्वानावरचा चित्रपट आहे. एरव्ही मालकाशी इमान राखणारा कुत्रा त्याच मालकाचा जीव कसा घेऊ शकेल?, हा प्रश्न भोंडेला सतावतो. भोंडे श्वानप्रेमी आहे आणि त्याच प्रेमातून तो या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतो. यात मग विनायक भांडारकरचा भाऊ विक्रम (सौरभ गोखले), विनायकचे आईवडील, सरकारी इस्पितळाचे डॉक्टर दळवी (शरद पोंक्षे) अशी एकेक कडी जोडली जाते. काही एका काळानंतर भोंडेला हे रहस्य शोधण्यात नव्हे तर या प्रकरणात अडकलेल्या कुत्र्याला वाचवण्यात रस आहे हेही दिग्दर्शक स्पष्ट करतो. त्यामुळे रहस्यपट म्हणून या चित्रपटाकडे पाहणे चुकीचे ठरेल. त्याअर्थाने, हा खरा रहस्यपट नाही तरीही त्याची कथा वेगळी असल्याने ती लक्ष वेधून घेते. व्यंकटेश भोंडेची स्वत:ची एक शोकांतिका समांतरपणे सुरू असते. त्याचे आणि त्याच्या पत्नीमधील नाते (अश्विनी एकबोटे) हाही या कथेचा एक पदर आहे. मात्र रहस्यमयपटाच्या गोळीतून ‘मुक्या प्राण्यांवर प्रेम करा’ हा संदेश देणारी यशस्वी मांडणी दिग्दर्शकाने केली आहे.

प्रशांत दामले पहिल्यांदाच इतक्या मोठय़ा आणि प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांसमोर आले आहेत. सहजविनोद ही त्यांची खासियत आहे, ताकद आहे त्यामुळे गुप्तहेर म्हणून त्यांची निवड कशी असेल?, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मात्र इथे व्यंकटेश भोंडे हा माजी पोलीस हवालदार आहे, सर्वसामान्य आहे आणि तरीही त्याच्या उपजत हुशारीने तो माग काढायचा प्रयत्न करतो आहे. या व्यक्तिरेखेत प्रशांत दामले फिट बसले आहेत. श्वानप्रेमी म्हणून भोंडेचा ध्यास, त्यांचे वेड एकीकडे आणि दुसरीक डे स्वत:च्या शोकांतिकेचे ओझे घेऊन वावरणाऱ्या भोंडेची घालमेल या दोन्ही गोष्टी त्यांनी कमालीच्या सहजतेने रंगवल्या आहेत. त्यांच्या सहजविनोदी अभिनयाने साहजिकच या रहस्यमय पटात खुसखुशीतपणाही आला आहे. चित्रपटात तार्किकदृष्टय़ा खटकणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. भोंडेचे सहज भांडारकरांच्या घरात घुसणे, विक्रमचा मोबाइल सहजी चोरून त्यातील डेटा काढून घेणे, खुनाच्या वेळी वापरण्यात आलेला सूट असा अचानक खेळणाऱ्या मुलांकडे दिसणे हे तर्काच्या पातळीवर पटत नाही. त्यामुळे रहस्यमय पटाच्या पाश्र्वभूमीवर श्वानप्रेमाची वेगळी कथा सांगणारा चित्रपट या दृष्टिकोनातून ‘भो भो’ पाहणे उचित ठरेल.

 

भो भो

दिग्दर्शक – भरत गायकवाड

निर्माता – भरत गायकवाड

कलाकार – प्रशांत दामले, सुबोध भावे, सौरभ गोखले, अनुजा साठे-गोखले, संजय मोने, शरद पोंक्षे, अश्विनी एकबोटे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2016 3:44 am

Web Title: bho bho movie review
Next Stories
1 पृथ्वी’त मराठी नाटके!
2 मनोज वाजपेयीला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’
3 जलयुक्त लातूरसाठी रितेश देशमुखने दिला २५ लाखांचा निधी
Just Now!
X