बिग बी अमिताभ बच्चन याचा ‘चेहरे’ या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालंय. अभिनेता इमरान हाश्मीने सोशल मीडियावर सिनेमाचं पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीख जाहीर केलीय. 30 एप्रिलला ‘चेहरे’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात इमरान हाश्मी आणि बिग बी मुख्य भूमिकेत असणार आहेत. सिनेमातील सर्व स्टारकास्ट सिनेमाच्या पोस्टरमध्ये झळकतेय. मात्र या चेहऱ्यांमध्ये एक ‘चेहरा’ गायब असल्याचं दिसतंय. हा चेहरा म्हणजे रिया चक्रवर्ती.

‘चेहरे’ सिनेमा 2020 सालातच प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. या सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये रिया चक्रवर्तीच्या नावाची घोषणा देखील करण्यात आली होती. 2020 च्या जुलै महिन्यात रियानं या सिनेमातील तिचा पहिला लूकही चाहत्यांसोबत शेअर केला होता. याचा अर्थ रियाने चित्रिकरणाला सुरुवात केली होती. मात्र आता सिनेमाचं पोस्टर पाहता रिया चक्रवर्तीचा सिनेमातून पत्ता कट केल्याचं पाहायला मिळतंय.

इमरान हाश्मीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये  सिनेमातील कलाकरांची नाव टॅग केली आहेत. या नावांमध्येही रियाचं नाव नाही. तर पोस्टरमध्येही फक्त क्रिस्टल डिसूजा ही अभिनेत्री दिसतेय. यावरुन रियाच्या जागी आता क्रिस्टलला रिप्लेस करण्यात आलं आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. सिनेमाच्या पोस्टरमध्येच मोठा सस्पेंस पाहायला मिळतोय. मात्र रिया चक्रवर्ती पोस्टरमध्ये नसल्याने आणखी एक नवा सस्पेंस तयार झाल्याचं पाहायला मिळतंय.

गेल्या वर्षी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या  प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सीबीआयने कसून चौकशी केली होती. या चौकशी दरम्यान ड्रग प्रकरण समोर आल्यानं एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली होती. एक महिन्याच्या तुरुंगवासानंतर रियाची जामिनावर सुटका झाली. या सर्व प्रकरणात रिया खोलवर अडकत गेली.

‘चेहरे’ सिनेमाचं दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केलंय. रुमी यांनी कायम रियाला पाठिंबा दिल्याचं दिसून आलंय. स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीत रुमी म्हणाले ” तिच्यासाठी हे वर्ष अत्यंत वाईट होतं. अर्थातच सगळ्यांसाठीच हे वर्ष वाईट होत. पण तिच्यावर तर एक मोठा आघात झालाय. तुम्ही कल्पना तरी करु शकता का, की एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी संपूर्ण एक महिना जेलमध्ये घालवते? यामुळे तिचं मनोबल पुरतं खचलंय” असं म्हणत रुमी यांनी रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिला होता.

रिया चक्रवर्ती लवकरच काम सुरु करेल आणि आपण तिची भेट घेतली असल्याचा खुलासा दिग्दर्शक रुमी जाफरी यांनी केला होता. तर ‘मिड-डे’ ला दिलेल्या मुलाखतीत रुमी म्हणाले होते “मला खात्री आहे ती या परिस्थितीतून बाहेर येईल. सर्व जण धैर्य देत असतात पण जो अशा परिस्थितीतून जातो त्यालाचं ते दु:ख कळतं. पण वेळेबरोबर सर्व काही ठीक होईल” असं ते म्हणाले.

दिग्दर्शक रुमी जाफरी यांनी रियाची बाजू मांडण्याचा अनेकदा प्रयत्न केल्याचं दिसून आलंय. मात्र असं असतानाही पोस्टरमधून गायब झालेला रियाचा चेहरा अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. इतर कलाकारांच्या निर्णयामुळे हा बदल करण्यात आला का?,  दिग्दर्शक किंवा निर्मात्यांनी दडपणाखाली हा निर्णय घेतला आहे का? या प्रश्नांची उत्तर कदाचित येत्या काळात स्पष्ट होतील.