कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी हा बहुचर्चित रिअॅलिटी शो चांगलाच गाजत आहे. आधी हिंदी, तेलुगू, कन्नड अशा बऱ्याच भाषांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या या शोचा मराठी पर्वसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. १५ एप्रिलपासून या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला आणि पहिल्या दिवसापासूनच त्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. कार्यक्रमाच्या नियमांनुसार एक सदस्य दर आठवड्याला घरातून बाहेर पडत असतो आणि याबद्दलची धाकधूक प्रत्येक सदस्याच्या मनात असते. बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनच्या पहिल्या आठवड्यात कोण घराबाहेर जाणार हा प्रश्न अनेकांच्या मनात होता. म्हणूनच या प्रक्रियेतून आपल्या आवडत्या स्पर्धकाला वाचविण्यासाठी प्रेक्षकांनी भरपूर मतं दिली पण ज्या सदस्याला कमी मतं मिळाली त्याला या घरामधून बाहेर पडणं भाग होतं. पहिल्या आठवड्यात भूषण कडू, अनिल थत्ते आणि आरती सोलंकी ‘डेंजर झोन’मध्ये गेले. पहिल्या नॉमिनेशन प्रक्रीयेमध्ये कमी मतं मिळाल्याने आरती सोलंकी हिला घराबाहेर जावं लागलं.

बिग बॉसच्या घरात टिकायचं असल्यास संयम आणि एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती अत्यंत महत्त्वाची असते. घरातले हे स्पर्धक एकमेकांना चांगल्या पद्धतीने ओळखत नसल्याने खटके उडणे, भांडणं, मतभेद होणं तर साहजिक आहे. पण या सगळ्यावर मात करून तुम्ही कसं पुढे जाता हे महत्त्वाचं आहे. बिग बॉसच्या घरात आरतीचे काही चांगले नवे मित्र- मैत्रिणी झाले तर काही बिघडलेली जुनी नाती चांगली झाली. उषा नाडकर्णी, सईसोबत तिने चांगला वेळ घालवला. तर मेघा धाडेसोबत पुन्हा मैत्रीदेखील झाली. मात्र, पहिल्याच आठवड्यात तिला हे घर सोडून जावं लागलं.

वाचा : महेश बाबूचा हा चित्रपट ठरतोय सुपरहिट; दोन दिवसांत जमवला १०० कोटींचा गल्ला 

‘ऋतुजा, उषाजी आणि सई लोकूर यांसारखे चांगले मित्र मी बिग बॉसच्या घरात कमावले. पण काही जुन्या नात्यांनी साथ दिली नाही याची खंत नक्कीच मनात राहील. या तीन व्यक्ती सोडल्या तर बाकी सगळे स्पर्धक घरात माईंड गेम खेळत आहेत असं मी म्हणेन. पहिल्याच आठवड्यात बाहेर पडावं लागतंय याचं खूप वाईट वाटत आहे,’ अशी प्रतिक्रिया तिनं घराबाहेर आल्यावर दिली.

नियमांनुसार घराबाहेर पडणाऱ्या सदस्याला एक विशेषाधिकार मिळतो ज्यानुसार ती कोणत्याही एका स्पर्धकाला पुढच्या आठवड्याच्या नॉमिनेशन प्रक्रियेतून वाचवू शकते. या नियमानुसार आरतीने उषा नाडकर्णी यांना वाचवलं. आता येत्या आठवड्यात कोण नॉमिनेट होईल आणि प्रेक्षकांची मतं कोणाला वाचवेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.