लहानपणी कृष्ण होऊन तर, मोठेपणी रुपेरी पडद्यावरील चॉकलेट बॉय म्हणून विशेष लोकप्रियता मिळवलेला अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यापर्यंत यश मिळविणाऱ्या स्वप्नीलने मध्यंतरी आलेल्या मोगरा फुलला या चित्रपटाच्या माध्यमातून त्याची चॉकलेट बॉय ही प्रतिमा पुसण्याचा प्रयत्न केला होता. यात तो काही अंशी यशस्वीही ठरला. आज त्याच स्वप्नील जोशीचा वाढदिवस.

१८ ऑक्टोबर, १९७७ रोजी मुंबईत त्याचा जन्म झाला. वयाच्या नवव्या वर्षी त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हिंदी – मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून त्याने अभिनय केला. त्यानंतर त्याची विनोदी अभिनेता आणि स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळख निर्माण झाली.
स्वप्नील जोशीने श्रीकृष्णाच्या रुपात पहिली मोठी भूमिका केली; नंतर तो विविध भूमिकांत दिसला, ‘कॉमेडी सर्कस’मधून त्याने सगळ्यांना हसवले. मात्र कधी अभिनय, कधी निवेदन; तर कधी परीक्षक या सगळ्या रूपात कायम राहिली ती त्याची “चॉकलेट बॉय’ची प्रतिमा. ‘चेकमेट’ या २००८ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटामध्ये त्याने पहिल्यांदा प्रमुख भूमिका बजावली होती. ‘मुंबई – पुणे – मुंबई’ या चित्रपटातली त्याची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली. त्यानंतर ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ ही मालिका आणि ‘मंगलाष्टक वन्स मोअर’ या चित्रपटामध्ये तो मुक्ता बर्वे बरोबर प्रेक्षकांसमोर आला.

‘दुनियादारी’ ने तर त्याच्या यशात विशेष भर घातली. ‘तु ही रे’, ‘मितवा’, ‘मुंबई-पुणे-मुंबई २’ या चित्रपटांनी तर त्याच्या चाहत्यांना मनोरंजनाची अनोखी मेजवानीच दिली. हरे काच की चुडियाँ, कॉमेडी सर्कस – १ आणि २ यासारख्या हिंदी मालिकांमधूनही तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. आजच्या घडीला मराठी चित्रपटसृष्टीत स्वप्नील हा आघाडीचा अभिनेता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्यावसायिक आयुष्यात तो ज्याप्रमाणे रोमॅण्टिक भूमिका करतो त्याचप्रमाणे तो वैयक्तिक आयुष्यातही तितकाच रोमॅण्टिक आहे. व्यवसायाने दंतवैद्य असलेल्या लीनाशी त्याने २०११ साली औरंगाबादमधील ताज हॉटेलमध्ये विवाह केला.