कर्नाटकमध्ये अभिनेता प्रकाश राज यांच्या कार्यक्रमानंतर भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या सदस्यांनी संपूर्ण मंचावर गोमूत्र शिंपडल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकाश राज यांनी कन्नड वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीचे कात्रण ट्विट करत याबद्दलची माहिती दिली. प्रकाश म्हणाले की, कर्नाटकमध्ये राघवेंद्र मठात त्यांचा एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमात प्रकाश यांनी केंद्रीय मंत्री अनंत हेगडे यांच्याविरोधात टीका केली. ही टीका भाजप युवा मोर्चाच्या सदस्यांना फारशी आवडली नाही. मकरसंक्रांतीच्या दिवशी युवा मोर्चाच्या सदस्यांनी गोमूत्राने कार्यक्रम स्थळाची साफसफाई केली. या प्रकारानंतर ‘मी जिथे जिथे जाईन तिथे भाजपचे लोक अशाच पद्धतीने गोमूत्राने जागा साफ करणार का?’ असा प्रश्न प्रकाश यांनी विचारला.

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाच्या युवा मोर्चाचा पदाधिकारी विशाल मराटेच्या नेतृत्वामध्ये ही सफाई करण्यात आली. प्रसारमाध्यमांशी बोलताना मराटे म्हणाला की, ज्या मंचावर प्रकाश राज यांनी भाषण केले होते. त्या मंचासह संपूर्ण भाग गोमूत्राने स्वच्छ करण्यात आला. अशा स्वघोषित बुद्धीजीवी लोकांनी आमच्या धार्मिक प्रतिष्ठानाला अशुद्ध केले आहे. हिंदू देवतांचे अपमान करणारा आणि बीफ खायला प्रोत्साहित करणारे लोक इथे आल्याने आम्ही सिरसी निवासी अशुद्ध झाले आहोत. समाज अशा डाव्या विचारसरणीच्या व्यक्तींना आम्ही कधीही माफ करणार नाही. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर अभिनेता प्रकाश राज यांनी भाजपविरोधात जोरदार टीका केली होती.