dilip-thakurअनेक चित्रपट कलाकार विविध पक्षांचे खासदार, आमदार, अगदी मंत्रीदेखील झाल्याने कलाकाराने राजकारणात पडावे की नाही या प्रश्नाची चर्चा करण्याची काहीच गरज नसावी. एखादा अमिताभ खासदारकीचा राजीनामा देऊन चित्रपटसृष्टीत रमला, शेखर सुमन लोकसभा निवडणुकीत पराभूत झाला, स्मृती इराणीचे मंत्रीपद गाजले. पण राजेश खन्नाने खासदारकीच्या काळात काही फिल्मवाल्यांची कामे केली… सगळ्यांच्याच प्रगती पुस्तकात चांगलेच गुण असतील असे नव्हे. कोणी कलाकार जनतेच्या मतांवर विजयी झाले तर कोणाची राज्यसभेवर नियुक्ती झाली. पण लोकशाहीत मतदानाप्रमाणेच निवडणूक लढविण्याचाही अधिकार सगळ्यांनाच आहे. डॉक्टर, वकील, साहित्यिक पत्रकार वगैरे विविध पेशातील सदगृहस्थ राजकारणात येतात तसेच कलाकारांनाही येऊ द्यावे. सगळेच कलाकार संवाद लेखकांचेच संवाद बोलून टाळ्या मिळवतात असे नव्हे. आणि ते एकूणच लोकशाही प्रक्रियेचा विचारच करत नाहीत असे का समजावे? अनेक कलाकार उत्तम पदवीधर आहेत ही गोष्ट त्यांच्या सुज्ञतेचा भक्कम पुरावा आहे. त्यांनीही फक्त निवडणूक प्रचारात ‘शोभायात्रे’पुरते राहू नये. इतकेच नव्हे तर आपलाच एखादा कलाकार या सत्तेच्या राजकारणात उमेदवार असेल तर संपूर्ण चित्रपटसृष्टीने मतभेद, मनभेद, पक्षभेद विसरून त्याच्या विजयासाठी प्रयत्न करावेत. कारण तो आमदार वा खासदार झाल्यावर चित्रपटसृष्टीतील काही समस्या अधिक वेधकपणे शासनासमोर नेऊ शकतो. अगदी एखाद्या कलाकाराने महापालिका निवडणूक जिंकून नगरसेवक व्हायलाही हरकत नाही. कारण चित्रपटसृष्टी व पालिका यांचा विविध कारणास्तव संबंध येतोच व कलाकारच जर नगरसेवक असेल तर त्या गोष्टीत काही संवाद होऊ शकतो. मार्गदेखील निघू शकतो. प्रत्येक पालिका हद्दीतील चित्रपटगृह व लहान मोठे स्टुडिओ यांचा मालमत्ता कर, चित्रपटगृहावरचे डेकोरेशन, शहरभरची पोस्टरबाजी, होर्डिंग्ज यांचे कर अशा काही गोष्टींवर कलाकार नगरसेवक उपयुक्त ठरु शकेल.

कलाकार अथवा सेलिब्रेटिजने पालिका निवडणूक लढवणे डाऊन मार्केट आहे हा समज चुकीचा आहे. अमिताभच्याच भाषेत सांगायचे तर कोई काम हल्का नही होता… नगरसेवक म्हणजे सोयीसुविधांची कामे त्यासाठी हे सेलिब्रेटिज नगरसेवक धावपळ ती कशी करणार हा प्रश्न असेल ना? काय सांगावे त्याचा ‘चेहरा’ अर्थात त्याच्याभोवतीचे वलय काही भेटीगाठीतून जनसामान्यांचा फायदा करणारे ठरेलही. काही वर्षांपूर्वी चेंबूरमधून सुरेश भागवत या कलाकाराने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविलीय. तो नागरी सुविधांबाबत संवेदनशील होता. त्याचा पराभव झाला असला तरी त्याचा प्रयत्न प्रामाणिक होता. असे निवडणूक जिंकून कलाकाराला नगरसेवक होणे अवघड वाटत असेल तर स्वीकृत सदस्य म्हणून एखाद्या कलाकाराला संधी लाभावी. चित्रपटसृष्टीच्या पालिकेतील कामाना गती येण्यास त्याचा फायदा होईलही. मनोरंजन विश्व विस्तारतेय, चित्रपट निर्मितीची संख्या वाढतेय, मुंबईतील स्टुडिओ कमी पडताहेत, कित्येक बंद कंपनीत चित्रीकरण होतेय, एकपडदा चित्रपटगृहाच्या भवितव्याची समस्या आहे… कलाकार नगरसेवक यात उत्तम संवाद घडवून आणू शकेलही. राजकारणातील राजकारणाची खेळी तो कसा हाताळतोय ही त्याची हुशारी झाली. खासदार कलाकारांकडून त्यासाठी काही टिप्स मिळू शकतात. सलमान खान, रविना टंडन, राखी सावंत विविध संदर्भात मुंबई पालिकेत आले इतरही येतील तेव्हा कलाकार नगरसेवक उपयुक्त ठरेल. अर्थात हा कलाकार नगरसेवक आपल्यातीलच कोणी बंगल्यात वा पाठीमागे केलेल्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यात आघाडीवर राहणार नाही, अशी अपेक्षा अगदीच भाबडी ठरु नये.

असो. काय सांगावे; खासदार कलाकाराप्रमाणेच तो नगरसेवकही होऊ शकतो ही विविध संदर्भात गरज ठरु शकते. ४०-४५ वर्षांपूर्वी हे पडद्यावरचे मोहरे राजकारणात येतील व खासदार बनतील अशी कल्पना तरी कुठे कोणी केली होती ?

आदमी सोचता कुछ और है और होता कुछ और है असा हिंदी चित्रपटातील हुकमी संवाद याबाबत प्रत्यक्षात येऊन एखादा कलाकार स्वीकृत सदस्य नगरसेवक होऊ शकेलही…. खरंतर व्हावाच. सत्तेच्या राजकारणात सर्व समाज व्यवस्थेमधील घटक असावेतच. होय ना?
– दिलीप ठाकूर