#SonaliBendre बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाला आहे. ट्विटरच्या माध्यमातून तिने स्वत: ही धक्कादायक माहिती दिली आहे. सोनालीवर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार सुरू आहेत. ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ या रिअॅलिटी शोमध्ये ती परीक्षक होती. मात्र वैयक्तिक कारण सांगत सोनालीने हा शो अर्ध्यावरच सोडला होता. ‘सरफरोश’, ‘हम साथ साथ है’ आणि ‘लज्जा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने दमदार भूमिका साकारली आहे.

ट्विटरवरील भावनिक पोस्टमध्ये तिने लिहिलं की, ‘कधी कधी तुम्हाला काही गोष्टींची कुणकुण लागते आणि अनपेक्षितपणे तुमच्या आयुष्यात बदल होतो. मला हाय- ग्रेड कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. सतत वेदना जाणवत असल्याने काही चाचण्या केल्या आणि त्यातून कॅन्सर झाल्याचं अनपेक्षितपणे निदान झालं. माझे कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मैत्रिणींनी खूप साथ दिली आहे. त्या सर्वांचे मी आभार मानते.’

‘डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी त्यावर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या मार्गातील प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्यास मी सज्ज आहे. यात गेल्या काही दिवसांपासून लोकांकडून मला मिळत असलेल्या प्रेमाची फार मदत होत आहे. कुटुंबीय आणि मित्र-परिवार माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याने मी ही लढाई लढण्यास सज्ज आहे.’

कॅन्सरमुळे झी टीव्हीवरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘इंडियाज बेस्ट ड्रामेबाज’ अर्ध्यावरच सोडून सोनाली न्यूयॉर्कला उपचारासाठी रवाना झाली. तिच्या जागी परीक्षक म्हणून आता अभिनेत्री हुमा कुरेशी या शोमध्ये पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूड कलाकारांमध्ये दुर्धर आजारांची मालिका वाढत आहे. याआधी अभिनेता इरफान खानला न्यूरोएंडोक्राइन ट्युमर हा दुर्धर आजार झाल्याची माहिती समोर आली.