रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना. या महिन्यात रोजे अर्थात उपवास करण्यासोबतच अनेक गोष्टींची बंधन स्वत:वर घालून घ्यायची असतात. त्यामुळे रमजानचा महिना मुस्लीम बांधवांसाठी खास असतो. त्यातच रमजान ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव एकमेकांची गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा देतात. यात अभिनेता अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुस्लीम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“तुम्हा सगळ्यांना ईदच्या मनापासून शुभेच्छा. निरोगी आयुष्य,मित्र-परिवार या सगळ्यांसाठी या दिवशी प्रार्थना करा. आपण प्रेम, शांती आणि बंधुभाव यांच्या जोरावर एकमेकांची साथ देऊ”, अशी पोस्ट अमिताभ बच्चन यांनी शेअर केली आहे.

अमिताभ बच्चन यांची पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच त्यांना ईदच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. बिग बी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून बऱ्याच वेळा ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. यात सध्या ते जनतेला घरात राहण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. तसं करोनाविषयी चाहत्यांमध्ये जनजागृतीदेखील करत आहेत.