गेल्या काही महिन्यांमध्ये टीव्हीवरील विविध वाहिन्यांनी त्यांच्या मालिका, स्वरूप यामध्ये वेगवेगळे बदल आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. या स्पर्धेमध्ये ‘एएक्सएन’ वाहिनीनेही आपले स्वरूप पालटण्याचे काम हाती घेतले आहे. यापुढे वाहिनीने शहरी भागातील उच्चभ्रू प्रेक्षकांसोबतच निमशहरी भागातील प्रेक्षकांनाही आपलेसे करण्यासाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम हाती घेतले आहेत.
अमेरिकन मालिका आणि शोजचा एक चाहता वर्ग भारतात आहे. ‘एएक्सएन’ वाहिनीने नेमका हाच प्रेक्षकवर्ग हेरून त्यांच्यासाठी विविध अमेरिकन शोजची मेजवानी सतत आणली आहे. अर्थात, गेल्या काही वर्षांमध्ये वाढत्या डिझिटायझेशनमुळे निमशहरी भागातही इंग्रजी मालिकांचा प्रेक्षक वाढू लागला आहे. हीच बाब ध्यानात घेऊन वाहिनीने आपल्या विस्ताराची मोहीम हाती घेतल्याचे वाहिनीचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड सौरभ याज्ञिक यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांमध्ये वाहिनीच्या प्रेक्षकवर्गामध्ये ३० टक्क्यांनी वाढ झाली असून, त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील मुंबईसोबतच पुणे, नागपूर, नाशिक येथील प्रेक्षकवर्गामध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. त्यामुळे वाहिनी या मराठमोळ्या प्रेक्षकवर्गाला आपलेसे करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. ६ एप्रिलपासून ‘डेक्सर’ आणि अनिल कपूरने प्रसिद्ध केलेल्या ‘२४’ची मूळ इंग्रजी मालिका या दोन मालिकांचे सर्व भाग वाहिनीवर दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय अमेरिकन शोज एकाच वेळी अमेरिका आणि भारतात दाखविण्याचा प्रयोगही करण्यात येणार आहे. तसेच ६ तारखेपासून वाहिनी ‘एचडी’ स्वरूपात पाहता येणार आहे. भारतीय प्रेक्षकांना रिअ‍ॅलिटी शोज हा फॉरमॅट प्रसिद्ध असल्याचे लक्षात घेऊन खास शोज आठवडय़ाच्या शेवटी दाखविण्यात येणार आहेत.