प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता- दिग्दर्शक राम गोपाल वर्मा कायमच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अलिकडेच त्यांनी महिलांविषयी एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा असंच बेताल वक्तव्य केल्यामुळे ते चर्चेत आले आहेत. राम गोपाल वर्मा यांनी एका मुलाखतीत कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमचे आभार मानले आहेत. ‘स्पॉटबॉय’च्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

राम गोपाल वर्मा यांचा ‘डी कंपनी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटानिमित्त त्यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी दाऊद इब्राहिमचे आभार मानले आहेत.

”डी कंपनी’ हा चित्रपट २०२१ मध्ये करोना विषाणू सारखा पसरणार आहे आणि याच्यावर कोणतंही व्हॅक्सीन नसेल. तसंच गँगस्टरसारख्या चित्रपटासाठी मी दाऊद इब्राहिमचे आभार मानतो”, असं राम गोपाल वर्मा म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं आहे. काही दिवसांपूर्वीच ‘डी कंपनी’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आणखी वाचा- लता मंगेशकर आणि पंडित नेहरुंचा उल्लेख असणारं ‘ते’ वक्तव्य केल्याने विशाल ददलानी होतोय ट्रोल

दरम्यान, सध्या राम गोपाल वर्मा यांना बॉलिवूडमध्ये बॅन करण्यात आलं आहे. त्यांनी चित्रपटाशी संबंधित कलाकार आणि अन्य कर्मचाऱ्यांचे जवळपास १.५ कोटी रुपये थकवल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉयज (एफडब्लूआइसीई) ने एका बैठकीत फेडरेशनच्या ३२ संघटनांपैकी कोणतीही संघटना राम गोपाल वर्मा यांच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवणार नाही असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सध्या राम गोपाल वर्मा बॉलिवूड बाहेर चित्रपटांची निर्मिती करत असल्याचं म्हटलं जात आहे.