करोनाविरोधात लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आर्थिक मदत करण्याचं आवाहन भारतीयांना केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना अभिनेता अक्षय कुमार याने २५ कोटी रुपयांचा निधी मदत म्हणून देण्याची घोषणा केली आहे. ट्विटवरुन अक्षयने ही माहिती दिली. मात्र अक्षयच्या या ट्विटवर आता त्याची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिने एक ट्विट करुन अक्षयच्या निर्णयानंतर काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली आहे.

करोनाविरोधात लढा देण्यासाठी संपूर्ण देश एकवटला आहे. अनेक उद्योजक, खेळाडू, कलाकार आर्थिक मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यातच पंतप्रधानांनी आपत्ती व्यवस्थापनाची कक्षा वाढवण्यासाठी तसंच नागरिकांच्या सुरक्षेसंबंधी संशोधनासाठी आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं. त्याच ट्विटवर रिप्लाय करत मोदींनी अक्षय कुमारने २५ कोटींच्या मदतीची घोषणा केली.

काय म्हणाला अक्षय?

अक्षय कुमारने ट्विट करत आपल्या लोकांसाठी मदत करण्याची हीच योग्य वेळ असल्याचं म्हटलं आहे. “हाच तो वेळ आहे जेव्हा आपल्या लोकांच्या जीवापेक्षा इतर काहीही महत्वाचं नसतं. त्यामुळेच  यासाठी जे काही गरजेचं आहे ते सगळं केलं पाहिजे. मी माझ्याकडील २५ कोटी रुपये पंतप्रधान केअर फंडसाठी देत आहे. चला आयुष्य वाचवू… जीव आहे तर सर्वा काही आहे,” असं अक्षयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

अक्षयने आपल्या बचत खात्यांमधून २५ कोटी देण्याचं आश्वासन दिलं आहे. त्याच संदर्भात ट्विंकलने एक ट्विट करत अक्षयने घेतलेल्या या निर्णयानंतर काय चर्चा झाली याबद्दल माहिती दिली आहे.

काय म्हणाली ट्विंकल आपल्या ट्विटमध्ये…

अक्षयने २५ कोटी इतकी मोठी रक्कम देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आपण त्याला एक प्रश्न विचारल्याचं ट्विंकलने ट्विटमध्ये सांगितलं. “या माणसाचा मला अभिमान आहे. एवढी मोठी रक्कम द्यायची आहे याबद्दल तुला खात्री आहे ना? कारण ती देण्यासाठी आपल्याला गुंतवणूक मोडावी लागेल असं मी त्याला विचारलं. त्यावर तो म्हणाला, मी जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. आज मी ज्या ठिकाणी आहे त्याचा विचार करता ज्या लोकांकडे काहीही नाही अशांना मदत करण्यापासून मी कसं मागे हटू,” असं ट्विट ट्विंकलने केलं आहे.

मदतीचा वाढता ओघ

फक्त अक्षय कुमारच नाही तर अनेक सेलिब्रेटी आणि उद्योगपती मदतीसाठी पुढे येत आहेत. मदतीसाठी हृतिक रोशन आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांनीदेखील पुढाकार घेतला आहे. . हृतिक रोशनने मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी एन-95 आणि एफएफपी-3 मास्क खरेदी केले आहेत. तर कपिल शर्माने पंतप्रधान मदत निधीमध्ये ५० लाख रुपयांची रक्कम दान केल्याची माहिती दिली आहे. करोना रुग्णांच्या उपचारासाठी अभिनेता प्रभासने तब्बल ४ कोटी रुपयांच्या आर्थिक मदत केली आहे. प्रभासने ४ कोटी रुपयांपैकी ३ कोटी रुपये पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीच्या माध्यमातून दिले आहेत. तर उर्वरित ५०-५० लाख रुपये अनुक्रमे आंध्र प्रदेश आणि तेलंगना राज्याच्या मुख्यमंत्री मदतनिधीसाठी दिले आहेत. दरम्यान, प्रभासप्रमाणेच दाक्षिणात्य कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या मदतीचा हात पुढे केला आहे. पवन कल्याण, रामचरण,चिरंजीवी, महेश बाबू या कलाकारांनी आर्थिक मदत केली आहे. पवन कल्याण यांनी २ कोटी रुपये मदतनिधी म्हणून दिले असून महेश बाबूने १ कोटी रुपयांची मदत केली आहे.