माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी कधीही अभिनयाचा गांभीर्याने विचार केलेला नाही. याआधी त्यांनी नागेश कुक्कनूर दिग्दर्शित ‘इक्बाल’ या चित्रपटात काम केले होते. त्यातही ते क्रिकेटपटू कपिल देव म्हणूनच प्रेक्षकांना दिसले होते. त्यानंतर ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’च्या सेटवर येऊनही त्यांनी विनोदांची फटकेबाजी केली होती. मात्र, या वेळी त्यांनी एक अभिनेता म्हणून छोटय़ा पडद्यावर छोटी खेळी करायचा निर्णय घेतला आहे. ‘स्टार प्लस’वरच्या आगामी ‘सुमीत संभाल लेगा’ या मालिकेत कपिल देव काम करणार आहेत; पण मालिकेतही मी ‘कपिल देव’ म्हणूनच वावरणार आहे, असे कपिल देव यांनी ‘वृत्तांत’शी बोलताना सांगितले.
वॉर्नर ब्रदर्सच्या ‘एव्हरीबडी लव्हज रेमंड’ या गाजलेल्या शोचा भारतीय अवतार असलेली ‘सुमीत संभाल लेगा’ ही मालिका ‘स्टार प्लस’ वाहिनीवर दाखल होते आहे. या मालिकेत काम करण्यासाठी क्रिकेटच्या मैदानात भल्याभल्यांची विकेट घेणाऱ्या कपिल देव यांना विचारणा झाली. या मालिकेच्या निर्मात्यांनी मला अभिनय करण्याविषयी विचारणा केली तेव्हा मला फारच आश्चर्य वाटले. ‘मी मालिकेत काम करावे असे तुम्हाला का वाटते आहे?’, हाच पहिला प्रश्न मी निर्मात्यांना विचारला होता; पण मग तुम्ही कपिल देव म्हणूनच या मालिकेत वावरायचे आहे. त्यामुळे तुम्हाला वेगळा अभिनय करण्याची गरजच नाही, असे निर्माता-दिग्दर्शकाने स्पष्ट केल्यानंतर मी मोकळा श्वास घेतला, असे कपिल देव यांनी सांगितले.
देवेन भोजानी दिग्दर्शित ‘सुमीत संभाल लेगा’ या मालिकेच्या निमित्ताने कपिल देव पहिल्यांदाच डेली सोपचे चित्रीकरण आणि रोजच कॅ मेऱ्यासमोर उभे राहून संवाद म्हणायच्या नव्या चक्रात सापडले आहेत. मी आजवर कित्येक वेळा कॅ मेऱ्यासमोर आलो आहे; पण तो अनुभव वेगळा होता. एखाद्या मालिकेत काम करायचे म्हणजे मुळात एक तर मी अभिनेता नाही. त्यामुळे हे कसे जमून येणार? हा प्रश्नच होता. मालिका खेळावर आधारित असल्याने मी काय करतो आहे हे निदान मला व्यवस्थित समजते आहे आणि दुसरे म्हणजे मूळ अमेरिकन मालिका मला माहिती होती. मला स्वत:ला हलक्याफुलक्या विनोदी कौटुंबिक मालिका पाहायला आवडतात. ‘सुमीत संभाल लेगा’ ही त्याच पठडीतील असल्याने मला कुठलीच अडचण आत्तापर्यंत जाणवलेली नाही. उलट, आमची कलाकारांची टीमही इतकी चांगली आहे की, आमचे प्रत्येक सीन अगदी झटपट ओके होतात, असे त्यांनी सांगितले.
कपिल देव यांचे एके काळचे सहकारी सुनील गावस्कर यांनी चित्रपटातून काम केले आहे. सिद्धू तर आजही विविध शोच्या माध्यमांतून लोकांचे मनोरंजन करत असतात; पण त्यांच्यामुळे आपल्यालाही टीव्ही-चित्रपटात काम करावे असे कधीच वाटले नसल्याचे कपिल देव यांनी स्पष्ट केले. ‘सुमीत संभाल लेगा’ या मालिकेची संकल्पनाच चांगली असल्याने या मालिकेत काम करावेसे वाटले. आता छोटय़ा पडद्यावरची ही खेळी प्रेक्षकांना किती पसंत पडते आहे, याची उत्सुकता असल्याचे त्यांनी सांगितले.