कॉमेडी क्वीन भारती सिंह तिच्या हटके अंदाजाने कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसते. सध्या भारती पती हर्षसोबत ‘डान्स दीवाने’ या शोचं सूत्रसंचालन करते. या मंचावरून प्रेक्षकांचं कायम मनोरंजन करणाऱ्या भारतीला नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये मात्र रडू कोसळलं.
एका स्पर्धकाच्या डान्स परफॉर्मन्सनंतर तिच्या भावनांचा बांध फुटला. डान्स सादर करणाऱ्या तरुणींने तिच्या डान्समधून एका सत्य घटनेवर आधारित नृत्य सादर केलं. एका महिलेने करोनामुळे आपल्या १४ दिवसाच्या बाळाला गमावल्याचं चित्रण या डान्समधून करण्यात आलं. हा परफॉर्मन्स पाहून शोमधील सर्वच यावेळी भावूक झाले.
हा परफॉर्मन्स पाहून शोमधील परिक्षक नोरा फतेही तसचं गेस्ट म्हणून आलेला सोनू सूद यालाही अश्रू आवरणं कठीण झालं. याच वेळी शोची होस्ट भारती पती हर्षसोबत मंचावर आली. यावेळी तिच्या अश्रूंचा बांध फुटला ती म्हणाली, ” आम्ही पण बाळाचा विचार करतोय. पण अशा गोष्टी पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर एकमेकांशी या विषयावर बोलण्याची इच्छाच होत नाही.” हे सांगत असताना भारतीला रडू कोसळलं. तर हर्षने तिला सावरण्याचा प्रयत्न केला.
View this post on Instagram
या डान्स परफॉर्मन्सनंतर मंचावर सगळे जण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांचे डोळे पाणावले. तर डान्स सादर करणाऱ्या स्पर्धकाला रडू आवरणं कठीण झालं होतं. “मी देखील एक आई असल्याने बाळाला गमावण्याचं दु:ख किती कठीण असू शकतं याची कल्पना करणं देखील शक्य नाही.” असं ती म्हणाली.
‘डान्स दीवाने’ च्या या एपिसोडचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.