बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोणनं पहिल्यादांच जेएनयूतील हल्ल्याप्रकरणी निषेध नोंदवला आहे. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर काही गुंडांनी हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थ्यांसह प्राध्यापकही जखमी झाले होते. या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी दीपिकानं जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला भेट दिली. यावेळी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होत तिने पाठिंबा दिला.

जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यावरून राजधानी दिल्लीसह देशातील वातावरण तापले आहे. घटनेची चौकशी करण्यासह तोंड लपवून आलेल्या हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. विद्यापीठात घुसून हल्ला करणारे अभाविपचे कार्यकर्ते होते असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. तर हा आरोप अभाविपनं फेटाळून लावला आहे. दरम्यान, या हल्ल्यानंतर बॉलिवूडमधील कलाकारांनी घटनेचा निषेध करत जाहीरपणे मोदी सरकार टीकाही केली. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे करण्यात आलेल्या आंदोलनात सिनेसृष्टीतील दिग्दर्शक, कलाकार सहभागी झाले होते.

दरम्यान, आघाडीची अभिनेत्री असलेल्या दीपिका पदुकोणनं प्रथमच या घटनेप्रकरणी भूमिका घेतली आहे. मंगळवारी सायंकाळी दीपिकानं जेएनयूमध्ये भेट दिली. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असून, या आंदोलनातही दीपिका सहभागी झाली आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.