करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामुळे या काळात सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण घरात आहेत. या काळात सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच ते घरी राहून काय करतायेत हेदेखील सांगत आहेत. यामध्ये बॉलिवूडे बाजीराव-मस्तानी अर्थात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणदेखील चाहत्यांच्या संपर्कात आहेत. विशेष म्हणजे रणवीरला एक आजार झाला असून दीपिकाने चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे.

अलिकडेच दीपिकाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीमध्ये तिने रणवीरला झालेल्या आजाराचा खुलासा केला. दीपिकाच्या या पोस्टवर रणवीरनेदेखील प्रतिक्रिया देत हा आजार झाल्याचं मान्य केलं आहे. रणवीरला हायपरसोमनिया हा आजार झाला असून तिने या आजाराविषयी संपूर्ण माहिती पोस्टमध्ये दिली आहे.

‘रणवीरला हायपरसोमनिया हा आजार झाला आहे. या आजारात व्यक्ती १२-१५ तास झोपूनही त्याला थकवा जाणवतो. हेच रणवीरच्या बाबतीत होत आहे’, असं दीपिकाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, दीपिका आणि रणवीर लॉकडाउन असल्यामुळे सध्या घरातच आहेत. या काळात दोघं एकमेकांसोबत क्वालिटी टाइम व्यतीत करत असून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सतत चाहत्यांच्या संपर्कात आहेत.