‘दिया और बाती फेम’ अभिनेत्री दीपिका सिंहला सोशल मीडियावर नुकतच ट्रोल करण्यात आलंय. तौते चक्रीवादळामुळे उन्मळून पडलेल्या झाडांसमोर दीपिकाने पावसात डान्स करत एक व्हिडीओ शेअर केला होता. तसचं पडलेल्या झाडाच्या फाद्यांमध्ये दीपिकाने फोटोशूट करत ते फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटो आणि व्हिडीओमुळे अनेक नेटकरी दीपिकावर चांगलेच संतापले. वादळात लोकांचं नुकसान होत असताना ही नाचतेय अशी टीका नेटकऱ्यांनी केली.

नेटकऱ्यांच्या या टीकेला आता दीपिकाने उत्तर दिलंय. ईटी टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दीपिकाने तिला कोणत्याही प्रकारचा पश्चाताप होत नसल्याचं ती म्हणाली आहे. ती म्हणाली, “मी माझ्या पोस्टवर कोणत्याही द्वेषपूर्ण कमेंट पाहिल्या नाहित. ९९ टक्के कमेंट या चांगल्या होत्या. तर माझ्या फोटो आणि डान्सवर फक्त एक टक्का लोकांनी वाईट कमेंट केल्या असतील. त्या वादळात माझ्या घरासमोर उभ्या असलेल्या कारवर जे झाडं उन्मळून पडलं ते पाच वर्षापूर्वी मीच आमच्या घरासमोर लावलं होतं. चार पाच दिवसांपूर्वीच आम्ही झाडं आता किती छान वाढलंय यावर चर्चा केली आणि वादळात नेमकं ते पडलं.आम्ही ते झाडं बाजूला केलं जेणेकरून रस्ता अडणार नाही. पालिकेच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला. मात्र पाऊस असल्याने त्यांनी नंतर येतो सांगितलं.” असं दीपिका म्हणाली.

मला त्याचा पश्चाताप नाही

शेअर केलेल्या व्हिडीओ आणि पोस्टबद्दल विचारलं असता ती म्हणाली, ” मी सकारत्मकता पसरवणं थांबवणार नाही.हे मी माझ्या आनंदासाठी करते. मला त्याचा पश्चाताप नाही मी फक्त सकारात्मकता पसरवण्याचा प्रयत्न केला. पण मी नागरिकांनी अशा पावसात बाहेर पडू नये असं नक्की सांगेन. हा भाग माझ्या घराबाहेरच असल्याने मी फक्त पाच मिनिटांसाठी बाहेर गेले होते. चक्रीवादळ खूपच भयानक होतं. वादळामुळे ज्यांचं नुकसान झालं त्यांच्याबद्दल मला नक्कीच आपुलकी आहे. जास्तीत जास्त वृक्षारोपण करणं हेच माझं ध्येय आहे. ” असं म्हणत दीपिकाने ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलंय.

वाचा: “किती लाजिरवाणं”; वादळात पडलेल्या झाडांसमोर डान्स केल्याने अभिनेत्री दीपिका सिंह ट्रोल

वेळ वाईट आहे म्हणून आपण वाईट बनू शकतं नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढे ती म्हणाली, ” या पावसाचं पाणी माझ्या घरातही शिरलं होतं. माझ्या घरातही लहान मुलं आहेत. आम्हीदेखील चिंतेत होतो. मात्र मी तो व्हिडीओ शेअर केला नाही. कारण आधीच सगळीकडे नकारात्मकता पसरली आहे. त्यात येणाऱ्या अडचणींचा व्हिडीओ शेअऱ करणं मला योग्य वाटलं नाही. मी फक्त सकारात्मकता पसरवण्यासाठी आणि चाहत्यांचं मनोरंजन करण्यासाठी सोशल मीडियावर डान्सचे व्हिडीओ शेअर करत असते” असं दीपिका म्हणाली आहे.
वेळ वाईट आहे म्हणून आपण वाईट बनू शकतं नाही असं दीपिका म्हणाली. तसचं अनेक सेलिब्रिटींना ट्रोलर्सचा सामना करावाच लागतो असंही ती म्हणाली.