आलिया भट्टला नेहमीच आपल्या बाबांचा म्हणजेच महेश भट्ट यांचा गर्व राहिला आहे. ‘हायवे’, ‘उडता पंजाब’, ‘डिअर झिंदगी’ यांसारख्या सिनेमातल्या उत्तम अभिनयामुळे तिने सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पाच वर्षांच्या तिच्या बॉलिवूड करिअरमध्ये तिला सुरुवातीला अनेक विरोधांचा सामना करावा लागला होता. पण येणाऱ्या प्रत्येक सिनेमांतून तिने तिच्यातली क्षमता आणि अभिनयच्या जोरावर तिने विरोधकांची तोंड बंद केली.
सध्या आलिया तिचा आगामी सिनेमा ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात तिच्यासोबत वरुण धवनही आहे. शशांक खेतान यांचे दिग्दर्शन असलेला हा सिनेमा येत्या १० मार्चला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना, तिच्यासाठी महेश भट्ट एखादा सिनेमा काढणार यावर त्यांच्याशी कधी चर्चा केली आहे का या प्रश्नाचे उत्तर देताना आलिया म्हणाली की, आम्ही या विषयावर चर्चा करतो. जेव्हा गोष्टी घडायच्या असतील तेव्हा त्या घडतील. संयम दाखवणे फार महत्त्वाचे आहे.
महेश भट्ट त्यांच्या मुलीचे कौतुक करण्याचे आणि प्रशंसा करण्याची एकही संधी सोडत नाहीत. तिला याबद्दल जेव्हा विचारले तेव्हा आलिया म्हणाली की, ‘ते खोटं बोलतात. मी त्यांना आत्ताच भेटले आणि बोलले की, पत्रकारांसमोर खोटं बोलू नका. प्रत्येकजण येऊन मला सांगतो की भट्ट साहेबांनी हे सांगितले, ते सांगितले. पण ते खरे नाही. मी एक स्टार आहे माझ्यासोबत काम करायला प्रत्येकालाच आवडेल हे काही खरे नाही. ते खोटं बोलतात.’ नंतर ती मस्करीमध्ये म्हणाली की, मी त्यांना आता फोन करेन आणि तुमच्यासमोर खरं बोलायला सांगेन. सिनेसृष्टीतल्या बाप-लेकीची ही जोडी म्हणूनच सगळ्यांना आवडते हो ना?
‘बर्दीनाथ की दुल्हनिया’ या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी ही जोडी जयपूरमध्ये पोहचली होती. जयपूरमध्ये प्रसिद्धीवेळी राजस्थान पत्रिकाशी बोलताना आलियाने लग्नाचा खर्च कमी प्रमाणात करणे अशक्य असल्याचे म्हटले होते. लग्नामध्ये अनावश्यक खर्च करण्याच्या नव्या कायद्यासंदर्भात आलियाला प्रश्न विचारण्यात आला होता. या नव्या कायद्यानुसार, लग्नामध्ये पाच लाखापेक्षा अधिक खर्च करणाऱ्याने एका गरिब मुलीचे लग्न लावू द्यावे, असा प्रसाव काँग्रेसच्या खासदार रंजित रंजन यांनी मांडला होता. या प्रश्नावर उत्तर देताना आलियाने लग्न कमी खर्चात करणे अशक्य असल्याचे मत व्यक्त केले होते. आजच्या घडीला पाच लाख रुपये फक्त वधूच्या कपड्यासाठी लागतात, असे आलिया म्हणाली होती.