बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना बुधवारी श्वास घेण्यासाठी अडचण येत असल्यानं मुंबईतल्या हिंदुजा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर आहे. पण तरीही त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये ठेवण्यात आलंय. दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी ही माहिती दिलीय. पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांना घरी नेण्यासाठी तयारी केली होती. मात्र यासाठी त्या डॉक्टरांच्या परवानगीसाठी प्रतिक्षा करत होते. मात्र डॉक्टरांनी दिलीप कुमार यांना आज डिस्चार्ज देण्यास नकार दिलाय.

 

काही दिवसांपूर्वीच झाले होते डिस्चार्ज

काही दिवसांपूर्वीच दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यात अडचणी येत असल्यानं त्यांना मुंबईतल्या हिंदुजा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या फुप्फुसात पाणी भरल्यानं त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या फुप्फासातील पाणी काढल्यानंतर त्यांची ऑक्सिजन पातळी देखील वाढू लागली होती. प्रकृतीत सुधारणा पाहून अभिनेते दिलीप कुमार यांना ११ जून रोजी डिस्चार्ज देण्यात आला होता.

 

फुफ्फुसांतून काढले पाणी

दिलीप कुमार यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर चौथ्या दिवशी त्यांच्या फुफ्फुसांमधून पाणी काढण्यात आले. डॉक्टर जलील पारकर यांनी सांगितले की त्यांच्यावर योग्य ते उपचार केले आहेत. त्यामुळे आता त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी १०० झाली आहे.

त्यानंतर पुन्हा ३० जून रोजी दिलीप कुमार यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांचे फॅन्स दिलीप कुमार लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थन करताना दिसून येत आहेत. दिलीप कुमार बरे होऊन घरी परतण्याची ते वाट पाहत आहेत. “सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरीही त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असल्यानं आता तुम्ही त्यांच्यासाठी चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करा”, असं आवाहन देखील दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांनी केलंय.