बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर कलाविश्वातील घराणेशाही हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. अनेक मोठ्या कलाकारांची नाव या वादात पुढे आली. त्यामुळे अनेक निर्माते, दिग्दर्शक यांना या वादाचा फटकादेखील बसल्याचं पाहायला मिळालं. यामध्येच प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते सुभाष घई यांनी बॉलिवूडमधील घराणेशाही या मुद्द्यावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे. अलिकडेच झालेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते.

“गेल्या काही वर्षांमध्ये स्पर्धा निश्चितच वाढली आहे. त्यामुळे प्रत्येक चित्रपटासाठी प्रत्येकालाच प्रयत्न करावे लागतात. परंतु, या स्पर्धेमध्ये वंशवाद आणि घराणेशाही संपली आहे असं मला वाटतं. आता घराणेशाहीची जागा मेरिट सिस्टमने घेतली आहे. त्यामुळे प्रतिभावान कलाकारांना त्यांच्या कलागुणांनुसार भूमिका मिळत आहेत”, असं सुभाष घई म्हणाले.

पुढे ते म्हणतात, “गेल्या काही वर्षांमध्ये कलाविश्वात अनेक बदल झाले आहेत. जगातील सर्वात मोठा उद्योग म्हणून भारतीय मनोरंजन उद्योग उदयाला आला आहे. भारतीय चित्रपटांचं जगात नाव होत आहे. अनेक नवनवीन प्रतिभावान कलाकार उदयास येत आहेत. त्यामुळे स्पर्धा दिवसेंदिवस अधिक कठीण होत आहे. त्यामुळे या परिस्थितीत घराणेशाही टिकून राहणार नाही”.

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडमधील घराणेशाही हा मुद्दा चांगलाच चर्चेत आला. अनेक दिग्गज दिग्दर्शक, निर्मात्यांवर घराणेशाहीचे आरोप करण्यात आले होते. यामध्ये दिग्दर्शक करण जोहर याच्यावर सातत्याने सोशल मीडियावर टीका झाल्याचं पाहायला मिळालं.