‘औलादें बेटीयों से चलती है, बेटो से नहीं’ अशा शब्दांत गुलजार यांनी समस्त स्त्रीशक्ती आणि स्त्रीसामर्थ्यांची महती गायली. ज्यांना आपल्या एका मुलीमध्ये संपूर्ण जग गवसलं, त्यांची खरोखरीच कमाल आहे, असे सांगत त्यांनी एकाच मुलीवर पाळणा थांबवणाऱ्या माता-पित्यांचे कौतुक केले.
‘ॠतुरंग’तर्फे अरूण शेवते यांनी संपादित केलेल्या ‘एकच मुलगी’ या पुस्तकाचे प्रकाशन गुलजार यांच्या हस्ते गुरुवारी झाले. प्रभादेवीच्या पु. ल. देशपांडे अकादमीत पार पडलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. एकाच मुलीवर समाधान मानणाऱ्या १५ मान्यवर व्यक्तींनी आपल्या मुलीचे चित्र या पुस्तकात रेखाटले आहे. यापैकी ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी, सामाजिक कार्यकर्त्यां रझिया पटेल, आमदार नीलम गोऱ्हे स्वत: कार्यक्रमाला उपस्थित होत्या. एकाच मुलीमागच्या आपल्या भावना यावेळी त्यांनी मांडल्या.
गुलजार यांनाही एकच मुलगी. आपल्या मुलीच्या जन्मापासून तिच्या पौगंडावस्थेत आणि तेथून पुढे जेव्हा ती स्वत:च एका जीवाची जननी बनली तेव्हापर्यंतच्या तीन टप्प्यांवर लिहिलेल्या तीन कविता सादर करून गुलजार यांनी जणू स्त्रीची नव्हे आयुष्याचीच चित्तरकथा रेखाटली. मी पित्यापेक्षाही ‘मातृहृदयी’ अधिक आहे, असे गुलजार सांगतात. गुलजारांच्या या मातृहृदयी मनाचा हळुवार स्पर्श या कवितांच्या निमित्ताने उपस्थितांनी अनुभवला. मुलाला जन्म देताना मुलीला सोसाव्या लागलेल्या वेदना कवितांच्या ओळींमधून मांडताना ते नकळत हळवे झाले.
त्या आधीही अत्यंत भावुक होत त्यांनी समाजात स्त्रीच्या वाटेला येणाऱ्या त्रासावर, अत्याचारावर अत्यंत संवेदनशील असे भाष्य केले.
आपल्या भाषणाची सुरवातच त्यांनी ‘बेटीयों वालो का स्वागत’ म्हणत केली. आज स्त्रियांना ज्या लाजीरवाण्या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे ती सगळी आपलीच करणी आहे, अशी स्पष्टोक्ती करत ते म्हणाले की, ‘समाजानं स्त्रीला विविध रूपात पुजलं. पण, पूजा करून किंवा सन्मान देऊन समाज तिच्याविरोधात षडयंत्र तर रचत नव्हता ना, असा प्रश्न पडतो. स्त्रीकडे पाहण्याच्या पुरूषांच्या दृष्टीकोनांमध्ये तर प्रचंड विरोधाभास आहे. कधी कधी तर असं वाटतं की स्त्रियांकडे पुरूष न्यूनगंडाच्या भावनेनं पाहत असतो. त्याच्यातली ही भावना जाण्यासाठी त्याची संपूर्ण मानसिक धारणाच बदलायला हवी.’ स्त्रियांच्या बाबतीत पुरूषांकडून होणारे प्रमाद पाहता तर पुरूष असण्याचीही लाज वाटते, अशा शब्दांत त्यांचे हळवे मन महिलांवर पुरूषांकडून होणाऱ्या अत्याचारांवर व्यक्त झाले.
स्त्रीभ्रूण हत्येचा उल्लेख करत रझिया पटेल म्हणाल्या की, ‘मुलींना आईच्या पोटातही राहण्याचा अधिकार उरलेला नाही. जेव्हा वडिलांचे मन आईप्रमाणे विचार करायला लागेल तेव्हा स्त्रियांवरील अत्याचारासंबंधातील सर्वच समस्या सुटतील.’ सुलोचना दीदी यांनी भविष्यात मुलांना वाढविणे हे मोठे आव्हान पालकांसमोर असणार आहे. हे आव्हान पेलण्याची शक्ती त्यांना मिळो, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर एकाच मुलावर पाळणा थांबविणाऱ्या पालकांनी आपल्या मुलाला प्रेमाने गुदमरवून टाकू नये, अशी अपेक्षा नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अंबरीश मिश्र यांनी केले. त्यांच्या छोटय़ाछोटय़ा बोधपर गोष्टी, चुटके, शेर यांच्यामुळे कार्यक्रमातील औपचारिकपणही जणू गळून गेले होते.

गुलजार उवाच..
मैंने एक लडकी से मोहब्बत की.. और दुसरी बार मैने उसकी लडकीसे मोहब्बत की..
औलादें बेटीयों से चलती है, बेटो से नहीं
मै बाप कम और माँ जादा हूँ