विनोदवीर कपिल शर्मा पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आगमन करायला सज्ज झाला आहे. ‘फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा’ या नव्या शोद्वारे तो प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या शोचा पहिला पाहुणा कोण असेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतुहल पाहण्यात आले आहे. याचे उत्तर म्हणून कपिलच्या या शोचा नवा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या प्रोमोमध्ये कपिल अजय देवगणला त्याच्या नव्या शोमध्ये येण्याची विनंती करताना दिसत आहे. पण अजय मात्र कपिलचीच खिल्ली उडवताना दिसत आहे. कपिलने आतापर्यंत केलेल्या चुकांचा पाढा तो त्याच्याचसमोर म्हणत आहे.
४५ सेकंदांच्या या प्रोमोमध्ये कपिल अजयला फोन लावतो. पण कपिलचा फोन घेण्यात अजयला फारसं स्वारस्य नसल्यामुळे तो व्यग्र असल्याचे सांगतो. कपिल त्याला पुन्हा फोन लावतो आणि यावेळीही अजय हेच कारण पुढे करतो. यावेळी कपिल त्याला रेड मारण्याच्या उद्देशाने तरी एकदा शोमध्ये येऊन जाण्याची विनंती करतो. तेव्हा अजय त्याला खोचकपणे बोलतो की, ‘रेड त्यांच्याकडे मारली जाते, ज्यांच्याकडे पैसे असतात. शोचा हा प्रोमा फारच रंजक आहे.’
Kapil Sharma Shoots For The Promo..!! pic.twitter.com/q73zb0uaK8
— Akash Rajdeep (@Rajdeepakash) March 10, 2018
गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा टीव्हीवर पदार्पण कधी करणार याचीच उत्सुकता त्याच्या चाहत्यांना होती. त्यांची ही प्रतिक्षा संपली असून ‘फॅमिली टाइम विथ कपिल शर्मा’ या शोद्वारे तो प्रेक्षकांना खळखळून हसवायला सज्ज झाला आहे. त्याच्या शोचा पहिला पाहुणा म्हणून अजय देवगण येणार आहे. अजयचा ‘रेड’ हा आगामी सिनेमा १६ मार्चला प्रदर्शित होणार आहे. याच सिनेमाचे प्रमोशन करायला तो या शोमध्ये येणार आहे. या सिनेमात अजयसोबत इलियाना डीक्रुजची मुख्य भूमिका आहे. २५ मार्चला हा शो सोनी टीव्हीवर दाखवण्यात येणार आहे.