अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे या जोडीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. बॉलीवूडलाइफ डॉट कॉम या वेबसाईटने घेतलेल्या एका सर्वेक्षणामध्ये ४६ टक्के चाहत्यांनी सुशांत- अंकिता यांना एकत्र पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी झी टिव्ही वाहिनीवरील पवित्र रिश्ता या मालिकेत दोघांनी एकत्र काम केले होते. याच मालिकेदरम्यान दोघांमध्ये प्रेमसंबंध फुलले. परंतु दोन वर्षांपुर्वी दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला आणि त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
२१ जानेवारी २०१९ रोजी बॉलीवूडलाइफ डॉट कॉमने सुशांत सिंह राजपूतच्या वाढदिवसानिमित्त एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात अंकिता लोखंडे, आलिया भट, कॅटरिना कैफ व दिपिका पादुकोण या चार अभिनेत्री होत्या. या चौघींपैकी कोणत्या अभिनेत्रीला सुशांत सिंह राजपूतबरोबर अभिनय करताना चाहत्यांना पहायला आवडेल असा प्रश्न विचारण्यात आला. यावर प्रतिक्रीया देताना ४५ टक्के चाहत्यांनी अंकीता लोखंडेला आपले मत दिले. तसेच २३ टक्के आलिया भट, १७ टक्के कॅटरिना कैफ आणि १५ टक्के दिपिका पादुकोन या टक्केवारीत चाहत्यांनी आपली पसंती दर्शवली.
तुला पुन्हा एकदा सुशांतबरोबर काम करायला आवडेल का? असा प्रश्न नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अंकिता लोखंडेला विचारण्यात आला होता. यावर जर पटकथा चांगली असेल तर मी नक्की त्याच्याबरोबर काम करेन अशी प्रतिक्रीया अंकिताने दिली होती. सुशांत व अंकिता यांचे दोन वर्षापुर्वी ब्रेकअप झाले असले तरी आजही चाहत्यांना या दोघांना पुन्हा एकदा एकत्र काम करताना पाहण्याची इच्छा आहे.