पश्चिम बंगालमधील शालेय पुस्तकांमध्ये ज्येष्ठ धावपटू आणि ‘फ्लाइंग सीख’ म्हणून खुद्द मिल्खा सिंग यांच्या फोटोऐवजी अभिनेता फरहान अख्तरचा फोटो लावण्यात आला आहे. त्यावर फरहान अख्तर याने स्वत: नाराजी व्यक्त केल्यानंतर बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार यांनी या प्रकरणाबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. बायोपिकचा सध्या बराच ट्रेंड पहायला मिळत आहे. यामुळे कला, क्रिडा किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तीचा जीवनपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. विशेष म्हणजे या व्यक्तींचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायीही ठरु शकते. अशाच व्यक्तींच्या कार्याची ओळख शालेय विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी शालेय पुस्तकातही या नामवंत लोकांच्या आयुष्यातील काही गोष्टी धड्याच्या रुपाने देण्यात येतात.

आता मिल्खा सिंगच्या जागी फरहान अख्तरचा फोटो छापल्यामुळे शिक्षण मंडळावर सर्वच स्तरातून जोरदार टीका करण्यात आली. त्या टीकेला उत्तर देताना बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे खासदार देरेक ओबरीन म्हणाले, पाठ्यपुस्तकातील हा भाग सरकारी शाळांच्या अभ्यासक्रमात नाही तसेच त्याची छपाई सरकारकडून करण्यात आलेली नाही. तसेच अशाप्रकारची चूक कोणत्या खासगी कंपनीकडून करण्यात आली याबाबत सखोल चौकशी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. ट्विट करत त्यांनी या घटनेची दखल घेतली. अनेक क्षेत्रातून या घटनेमुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

एका व्यक्तीने ट्विटरच्या माध्यमातून ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर फरहान अख्तर याने स्वत: याबाबत आपली प्रतिक्रिया नोंदवली होती. ‘पश्चिम बंगालच्या शिक्षण मंत्र्यांकडे मी विनंती करतो की, त्यांनी पाठ्यपुस्तकात मिल्खा सिंग यांच्याऐवजी जो फोटो छापण्यात आला आहे तो कृपया बदलावा आणि पुस्तकाच्या चुकीच्या प्रती परत घ्याव्यात.’ अशी विनंतीही त्याने केली. यावर खासदार देरेक ओबरीन यांनी प्रतिक्रिया दिली. राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटात फरहानने मिल्खा सिंग यांची व्यक्तीरेखा मोठ्या ताकदीने साकारली होती.