‘यह जवानी है दिवानी’ हा चित्रपट आणि रणबीर कपूर या दोन गोष्टींनी सध्या दीपिकाला सध्या झपाटून टाकले आहे. ‘बचना ऐ हसीनों’मध्ये रणबीर आणि दीपिका पहिल्यांदा एकत्र आले होते. मग चित्रपट करता करता या हसीनाशी रणबीरचे प्रेमप्रकरण सुरू झाले. दीपिकाबरोबर ‘बचना..’ म्हणत सुरू झालेल्या प्रेमकहाणीला कतरिनाबरोबरची ‘अजब प्रेम की गजब कहानी’ सुरू होताच पूर्णविराम मिळाला. या खांद्यावरून त्या खांद्यावर रडत रडत धक्का सहन केल्यानंतर दीपिका सावरली आणि तिने आपल्या चित्रपट कारकीर्दीवर लक्ष केंद्रित केले. बॉलिवूडची टॉप अभिनेत्री म्हणून आपले स्थान निश्चित केल्यानंतर पुन्हा एकदा रणबीरबरोबर एकत्र काम करायला मिळालेला ‘यह जवानी है दिवानी’ हा चित्रपट वेगवेगळ्या अर्थाने दीपिकासाठी महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच शुक्रवारी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाला यश मिळावे यासाठी दीपिकाने दिवसभर उपवास करीत सिद्धिविनायकाचे दर्शनही घेतले.
कॉकटेल आणि रेस या दोन्ही चित्रपटांना यश मिळाल्यामुळे ‘यह जवानी है दिवानी’,  संजय लीला भन्साळीचा ‘राम लीला’ आणि रोहित शेट्टीचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ हे तीन मोठे चित्रपट दीपिकाच्या पदरात पडले. कॉकटेलनंतर आपल्याला ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांची मान्यता मिळाली, टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणना झाली, असे दीपिकाचे म्हणणे आहे. त्यामुळे बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निश्चित केल्यानंतर प्रदर्शित होणारा ‘यह जवानी है दिवानी’ हा चित्रपट आपल्या कारकीर्दीतला मैलाचा दगड ठरेल, असे तिला वाटते आहे. या चित्रपटाला यश मिळाले तर ‘राम लीला’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’लाही त्याचा फायदा होईल, परिणामी यशाची हॅटट्रिक साधता येईल, असे थोडक्यात गणित दीपिकाने मांडले आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘बचना ऐ हसीनों’मध्ये तिची आणि रणबीरची जोडी फारशी लोकप्रिय होऊ शकली नाही. त्यामुळे रणबीर आपल्या हातून सटकला आणि कॅटच्या जाळ्यात अडकला ही एक सल दीपिकाच्या मनात आहे. पण, त्यावेळी रणबीरनेही यशाची चव चाखली नव्हती. आता मात्र सर्वोत्तम अभिनेत्याचा शिक्का त्याच्यावर बसला आहे. तर दीपिकाही आता एक उत्तम अभिनेत्री झाली असल्याची पावती रणबीरने देऊन टाकली असल्याने न जाणो..‘यह जवानी.’चे यश ते प्रेमदिवाने दिवस परत देऊ शकतील, अशा आशेवर दीपिका आहे. म्हणून, चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आदल्या दिवशी उपवासाचे व्रत घ्यायचे आणि सिद्धिविनायकाच्या दर्शनाला जायचे, असा निर्धार दीपिकाने केला .